थोडक्यात
दिल्ली स्फोटाचं कनेक्शन ठाण्यापर्यंत
दिल्ली स्फोटातील मृतकांचा आकडा वाढला
स्फोटाचे तार महाराष्ट्रापर्यंत तर नाही ना याचा तपास सुरू
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आय 20 कारमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हा स्फोट घडवून आणण्यात आला. डॉ. उमर याने आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. देशात 6 डिसेंबर रोजी मोठे स्फोट घडवून आणण्याचा कट होता. पण तो अगोदरच उधळल्याने उमरने गडबडीत हा स्फोट केल्याची माहिती समोर येत आहे. या कार स्फोटात 12 हून अधिक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. याप्रकरणी तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरु केली आहे. आता स्फोटाचे तार महाराष्ट्रापर्यंत तर नाही ना याचा तपास सुरू झाला आहे.
दिल्लीचे स्फोटाचे कनेक्शन ठाण्यापर्यंत?
दिल्ली येथील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटाचे कनेक्शन ठाणे जिल्ह्यापर्यंत तर नाही ना या रोखाने तपास सुरू झाला आहे. ९ सप्टेंबर २०२५ या दिवशी कल्याण येथून आफताब कुरेशी आणि मुंब्रा येथून सुफियान शेख नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलने ताब्यात घेतले होते. ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवायामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना ताब्यात घेतले होते.
सुफियान आणि आफ्ताब देशात दहशतवादी हल्ले घडवणारे होते. त्यांचा दिल्ली लाल किल्ला बॅाम्ब स्फोटाशी संबंध आहे का? याची चौकशी दिल्ली स्पेशल सेल करणार आहे. आफताब आणि सुफियान यांच्या तपासात त्यांची जी मोडसओपरंडी समोर आलीये, त्या सारखाच कट लाल किल्ला येथील बॅाम्ब स्फोटात दिसून येत आहे. या संशयावरून या दोन्ही तरुणांची चौकशी केली जाणार अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुत्रांनी दिलीये. तसंच याआधी महाराष्ट्रातून दहशतवादी कृत्य आरोपाखाली अटक केलेल्यांची देखील होणार पुन्हा चौकशी देशात विविध ठिकाणी विविध दहशतवादी संघटना मिळून दहशतवादी कृत्य करणार होते या माहितीच्या आधारावर सर्व अटकेतील दहशतवाद्यांची चौकशी केली जाणार आहे.
13 जणांचा मृत्यू
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, दिल्ली स्फोटातील मृतकांचा आकडा वाढला आहे. आता या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. व्हॉईट कॉलर दहशतवाद्यांकडून असे हल्ले करण्याचा डाव जैशने आखल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्याची धमकी दिली होती. भारताने यावर्षी मे महिन्यात केलेल्या हल्ल्यात त्याचा जावाई आणि इतर नातेवाईक ठार झाले होते. तेव्हापासून तो भारतात अजून हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. देशातील जैशची स्लीपर सेल सक्रिय झाल्याचे या स्फोटातून समोर आले आहे.