पक्षफुटीनंतर दुरावलेले काका पुतण्या पुन्हा एकत्र दिसले. अजित पवारांनी शरद पवारांच्या दिल्लीतील घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ही भेट फक्त शुभेच्छा देण्यासाठी होती, की अजितदादांना यातून काही संदेश द्यायचाय, असा सवाल महाराष्ट्राला पडला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री, पद्मविभूषण शरद पवारांचा आज वाढदिवस. शरद पवारांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्वच नेत्यांना त्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या दिल्लीमधील जनपथ-6 या निवासस्थानी पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, खासदार सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांनीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
काकांच्या भेटीबाबत काय म्हणाले अजित पवार?
साहेबांचा आज वाढदिवस होता. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. चहा-पानी झाला. मंत्रिमंडळ बैठकीबाबत चर्चा झाली. ही कौटुंबिक भेट होती. विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली, राजकारणापलिकडेही काही संबंध असतात. मी घरचाच आहे, मी कुठे बाहेरचा आहे का? अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, टीका टिप्पणी करणारेही शुभेच्छा द्यायला आलेत, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला. या सगळ्या भेटीगाठींदरम्यान, शरद पवाराचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी मात्र एक सूचक विधान केलं. युगेंद्र पवार म्हणाले, पुढच्या वर्षी पाडवा एकत्र साजरा करू असं विधान केलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबिय नेमका काय संदेश देऊ पाहत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना, झालेला दिवाळी पाडवा, वेगवगेळा साजरा करणारे काका-पुतण्या वाढदिवसानिमित्त एकत्र दिसले. अर्थात ही भेट राजकीय नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला. पण त्यांनी कालच खातेवाटपासंदर्भात अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. लगेचच संसदेत जाऊन अमित शहांचीही पुन्हा भेट घेतली. त्यामुळे अजित दादा शरद पवारांचा एखादा मेसेज घेऊन तिकडे गेले, की माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडे असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.