मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेब ठाकरेंची आज 99वी जयंती आहे. त्यानिमित्त आज दोन्ही शिवसेनांकडून मेळ्यावांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचा मेळावा बीकेसी मैदान इथे होत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
बाळासाहेबांच्या विचार सोडणाऱ्यांची अवस्था न धर सोडता ही येत नाही ना धरता ही येत नसल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्याआधी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला हवी होती. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार त्यांनी पायदळी तुडवले आहेत. त्यांच्याविषयी काय सांगायचं असं म्हणत टोला लगावला आहे. स्वबळावर लढायचं म्हटल्यास मनगटात ताकद हवी असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“लोकसभेनंतर विधानसभेतही शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे, आणि यामागचे कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची धगधगती प्रेरणा आणि त्यांचे विचार,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा आपण जिवापाड सन्मान केला, म्हणूनच हा दणदणीत विजय मिळवता आला, आणि आज आपण विजयउत्सव साजरा करत आहोत.”
“हा विजय ऐतिहासिक आणि प्रेरणादायी”
शिंदे पुढे म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी आपण केलेला उठाव आणि त्यानंतर मिळवलेला विजय इतका देदीप्यमान आणि ऐतिहासिक आहे की, संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि जगभरात याची चर्चा होत आहे. पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आणि महायुतीच्या एकजुटीचा परिणाम आहे. हे यश अडीच वर्षांच्या अथक कष्टांचे आहे आणि राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, ज्येष्ठ यांच्यासाठी केलेल्या कामांचे फळ आहे.”
कामगिरीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “सत्तेच्या अडीच वर्षांत आपण पायाला भिंगरी लावून काम केले. एकही मिनिट वाया न घालवता विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालत राज्याच्या जनतेचा विश्वास जिंकला. याच कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला.”
“बाळासाहेबांना विजय समर्पित”
शिंदे यांनी या विजयाला बाळासाहेबांच्या जयंतीचे अप्रतिम गिफ्ट म्हणत सांगितले, “आज बाळासाहेब असते, तर त्यांनी आपल्या सगळ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. हा विजय बाळासाहेबांना समर्पित आहे.” या विजयाचा उत्साह आणि कृतज्ञता व्यक्त करताना शिंदेंनी राज्यातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे आभार मानले.