उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला असून, रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांचे एकमत झाले आहे. यावेळी शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर चर्चा झाली आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. सूत्रांच्या मते, उद्या शिंदे यांच्याकडून या मंत्र्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होणार आहे. हिवाळी अधिवेशनातच रविवारी नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी म्हणून इच्छुकांची जोरदार लॉबिंग, सेटिंग, फिल्डिंग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांची भेट महत्त्वाची ठरते. शिंदेंच्या शिवसेनाला आता कोणती खाती मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.