राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना, उत्तर पुणे जिल्ह्यात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर मतदान होत असून, या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येताना दिसत आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असताना त्यांचा विमान अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत त्यांचे निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आज पिंपळी गावात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. रोहित पवार म्हणाले की, “दादांचे स्वप्न होते की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून यावेत. दुर्दैवाने ते स्वप्न पाहणारे आज आपल्यात नाहीत. आज असे वाटते की, हेच त्यांचे अंतिम स्वप्न होते. मात्र, मला विश्वास आहे की मतदार आणि कार्यकर्ते ते स्वप्न नक्कीच पूर्ण करतील.”
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांची कायम इच्छा होती की पवार परिवार एकत्र यावा. “पवार साहेब, सुप्रिया ताई, आम्ही सगळेच त्या दिशेने प्रयत्न करत होतो. आज कोणताही निर्णय न घेता सर्वजण एकत्र आलो आहोत. परिवार पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतोय,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
दरम्यान, शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत विचारले असता रोहित पवार यांनी सांगितले की, “आमच्यात भावनिक चर्चा झाली. काही गोष्टी येत्या काळात कराव्या लागतील, पण त्या चर्चा राजकीय नव्हत्या.” त्यांनी सुनील तटकरे यांच्याविषयी बोलणे टाळले तसेच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही थेट भाष्य करण्याचे टाळले.
सुनेत्रा पवार यांच्याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सुनेत्रा काकींमध्ये मला अजित काका दिसतात.” तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिक्त असल्याने ती जबाबदारी सुनेत्रा पवार यांनाच मिळावी, अशी इच्छा कुठेतरी मनात असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.