महाराष्ट्राची शान आणि महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. रेशीम धागे, शुद्ध सोन्याची जर आणि अत्यंत बारकाईने केलेली हातमागावरील विणकाम यामुळे पैठणीला राजेशाही लुक मिळतो. पैठणी साडी परिधान करताच तिचा उठावदार आणि रॉयल अंदाज सहज लक्षात येतो. पारंपरिक नक्षीकाम, मोर, कमळ, अष्टकोनी बुट्टे ही तिची खास ओळख आहे. या साडीची किंमत विणकाम, डिझाइन आणि वापरलेल्या जरवर अवलंबून असते. साधारणपणे पैठणी साडीची किंमत २ लाखांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते,
दक्षिण भारतातील पारंपरिक कांचीवरम (कांजीवरम) साडी ही लग्नसोहळ्यांमध्ये विशेषत्वाने नेसली जाते. जड रेशीम, शुद्ध सोन्या-चांदीच्या जर आणि मजबूत विणकाम यासाठी ही साडी ओळखली जाते. हातमागावर विणली जाणारी कांजीवरम साडी टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असून ती अनेक वर्षे जशीच्या तशी राहते. मंदिरांची नक्षी, पारंपरिक काठ आणि समृद्ध रंगसंगती ही तिची वैशिष्ट्ये आहेत. नववधूच्या पेहरावात कांजीवरम साडीला मानाचं स्थान आहे. या साडीची किंमत तिच्या डिझाइन आणि कामानुसार साधारणपणे १.५ लाखांपासून ते ७ लाख रुपयांपर्यंत असते,
भारतातील साड्यांची राणी म्हणून ओळखली जाणारी बनारसी साडी आपल्या शाही सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. वाराणसीमध्ये हातमागावर विणली जाणारी ही साडी ओरिजनल रेशीम आणि सोन्या-चांदीच्या जरीच्या सूक्ष्म नक्षीकामामुळे वेगळी ठरते. फुलांची, मुगलकालीन आणि पारंपरिक डिझाइन्स हे बनारसी साडीचे वैशिष्ट्य आहे. लग्नसोहळे, सण-उत्सव आणि खास प्रसंगी बनारसी साडीला विशेष मागणी असते. तिच्या विणकामासाठी अनेक महिने लागतात. दर्जा, जरीचे प्रमाण आणि डिझाइननुसार बनारसी साडीची किंमत साधारण २ लाखांपासून ८ लाख रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकते,
आंध्रप्रदेशची पोचमपल्ली इकत साडी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनोख्या भूमितीय नक्षी आणि रंगसंगतीमुळे ही साडी तरुणांपासून पारंपरिक पोशाख प्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत आहे. अस्सल रेशमी धाग्यांपासून तयार होणाऱ्या या साडीमध्ये इकत विणकाम तंत्र वापरले जाते, ज्यासाठी आधी धागे रंगवले जातात आणि नंतर त्यावर नक्षी तयार केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत कष्टसाध्य असून वेळखाऊ आहे. दर्जा, डिझाइन आणि रेशीम यावर अवलंबून पोचमपल्ली इकत साडीची किंमत साधारण ८० हजारांपासून ४ लाख रुपयांपर्यंत असते.
गुजरातची पाटोला साडी तिच्या दुर्मिळ आणि अत्यंत किचकट ‘डबल इकत’ विणकाम पद्धतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या पद्धतीत साडीचे ताना आणि बाना दोन्ही धागे आधी रंगवले जातात आणि नंतर अचूक जुळवणी करत हातमागावर विणकाम केले जाते. ही प्रक्रिया इतकी अवघड असते की एकच पाटोला साडी तयार होण्यासाठी ६ महिने ते एक वर्ष लागू शकते. टिकाऊ रंग, सममित नक्षी आणि सांस्कृतिक वारसा यामुळे पाटोला साडीला विशेष महत्त्व आहे. तिची किंमत लाखोंमध्ये असते आणि ती प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जाते.