राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 11 मंत्रीपद वाट्याला येणार असल्याची माहिती मिळत आहे. सात केंद्रीय मंत्रीपद तर तीन ते चार राज्य मंत्रीपदं मिळू शकतात. एकनाथ शिंदेंकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, यांच्यासह मंगेश कुडाळकर, भरत गोगावले, राजेश क्षिरसागर अर्जुन, खोतकर, संजय शिरसाठ या नावांची चर्चा आहे. मात्र, यामध्येच गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारमध्ये असलेले तीन महत्त्वाचे मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे कृषिमंत्री होते. दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी होती. तर, तिथेच तानाजी सावंत यांनी आरोग्य खाते संभाळले होते. मात्र, या खात्यांमध्ये या मंत्र्यांचा कामावर समाधानी नसल्यानेच या तीनही नेत्यांना आगामी मंत्रिमंडळातून डावललं जाणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच इतरही काही कारणांमुळे या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या कारणांमुळे शिवसेनेच्या मंत्रांना डच्चू?
तानाजी सावंत यांच्यावरील आरोप
- आरोग्य खात्यात कथित ॲम्बुलन्स घोटाळ्याचा आरोप
- राज्यात नुकताच समोर आलेला बोगस औषध घोटाळा
- महायुतीत आल्यावर अजित पवारांवर केलेले वादग्रस्त वक्तव्य
- धाराशिवचे एस.पी.अतुल कुलकर्णी यांना फोनवरून धमकी
अब्दुल सत्तार यांच्यावरील आरोप
-कृषी खात्यात कीटकनाशक खरेदीत 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
-औरंगाबाद खंडपीठाकडून भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती
-हिंदुस्तान एज्युकेशन सोसायटीला शासनाचं मिळालेलं इरादा पत्र रद्द ठरवण्यात आलं
-शिक्षकांना प्रचाराला पाठवल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस
दीपक केसरकरांची वादग्रस्त वक्तव्य
-मंत्रालयात सातत्याने शिक्षण विभागाबाबत तक्रारी
-'एक राज्य एक गणवेश ' योजना वादग्रस्त ठरली
-'पुस्तकांचे गाव' ही योजना सुरूच झाली नाही
-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेवर वादग्रस्त विधान
या कारणांमुळेच शिवसेनेच्या नेत्यांच्या मंत्रीपद मिळण्याबाबत अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.