थोडक्यात
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं
चीनमध्ये सर्वप्रथम फटाक्यातील दारूचा शोध लागला
दिवाळी आणि आकाशबाजी एक समीकरण
दिवाळी म्हंटलं की... दिवे, आकाशकंदील, समई, पणती आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे फटाके समोर दिसतात. यातून आनंदाचा, उत्साहाचा प्रकाश सर्व ठिकाणी पसरतो. फटक्यांमधून निघणारा कारंजासारखा अग्नी आकर्षक आणि मोहक वाटतो. या अग्नीबद्दल बोलताना प्रसिद्ध इतिहासकार जॅक केल्ली म्हणतो की, "अग्नी हा पवित्र, दाहक आणि भयंकरच नाही तर तो मनोरंजकही आहे." त्यामुळे फटाक्यांची ही रात्र सर्वांना मंत्रमुग्धदेखील करते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं ठरतं
चीनमध्ये सर्वप्रथम फटाक्यातील दारूचा (गन पावडर) शोध लागला. तेव्हा त्याला 'डेव्हिल्स डिस्टिलेट' या नावाने ओळखले गेले. हा शोध सर्वांनाच धक्कादायक असला तरी त्यांना नव्या अविष्काराचा आनंदही होता. सुरुवातीला लष्करी वापरासाठी त्याचा फटक्यांचा वापर करण्यात आला. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही (पायरोटेक्निकल शो) त्याचा वापर वाढला. ही कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणारी गन पावडर चीन आणि अरब देशांतून भारत आणि युरोपमध्ये पहिल्यांदा पाठविण्यात आली.
भारतात १४४३ मध्ये विजयनगरचा राजा दुसरा देवराया याच्या दरबारात महानवमी सणाच्या निमित्ताने फटाक्यांचा वापर हा करण्यात आला, अब्दुर रज्जाक यांनी नमूद करून ठेवलं आहे. याच काळातील इटालियन प्रवासी लुडोव्हिको दी वर्थेमा यांनी विजयनगरमधील हत्तीसंदर्भात लिहून ठेवलं आहे की, "हत्तींना फटाक्यांची भीती वाटते. फटाके वापरले गेले तर उधळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणणं खूप अवघड होऊन जाईल."
याच अहवालामध्ये पंजाब विद्यापीठाचे इतिहासाचे शिक्षक राजीव लोचन यांनी सांगितला आहे की, प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जात होता. फटाक्यांचा आवाज करून नाही. फटाक्यांची परंपरा चीनवरून आली. चीनमध्ये असं मानलं जातं की, फटाके वाजवल्याने किंवा उडवल्याने वाईट आत्मा आणि दुर्भाग्य नष्ट होऊन भाग्य वाढतं. या ठिकाणहूनच बंगाली बौद्ध धर्म गुरु आतिश दीपांकर यांनीही परंपरा भारतात आणली. दुसरा दावा असा देखील केला जातो की, फटाके आणि आतषबाजीची सुरुवात मुघलांच्या काळानंतर सुरू झाली. मुघल त्यांच्यासोबत फटाके भारतात घेऊन आले. 13 व्या शतकाच्यामध्ये दिल्लीमध्ये पहिल्यांदा आतषबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
मध्ययुगीन इतिहासकार फरिश्ता त्यांच्या तारीख-ए-फरिश्ता पुस्तकांमध्ये सांगितलं आहे की, मार्च 1258 मध्ये फटाक्यांचा प्रयोग मुघल शासक हुलगु खान यांच्या दुताच्या स्वागतासाठी केला होता. जो सुल्तान नसरुद्दीन मेहमूद यांच्या दरबारामध्ये आला होता. मात्र याबाबत खात्रीशीर दावा देखील केला गेलेला नाही. मात्र अनेक इतिहासकारांकडून याचे दाखले दिले जातात की, मुघलांकडून आतषबाजीसाठी फटाक्यांचा भरपूर वापर केला जात होता. मात्र मुघलच भारतात फटाके घेऊन आले हे असं म्हणणं देखील पूर्णपणे योग्य ठरणार नाही. मात्र गन पावडर किंवा दारुगोळा वापरण्याची टेक्निक मुघल भारतात घेऊन आले एवढे नक्की. तर प्रोफेसर इक्तेदार आलम खान यांनी इतिहासकार फरिश्ता यांनी दावा केलेल्या फटाक्यांना युद्धात वापरल्या जाणाऱ्या दारुगोळा असल्याचे म्हटलं कारण दिल्लीमध्ये सुलतान फिरोजशहा तुघलकच्या राज्यामध्ये देखील फटाके वापरले जात होते.
तारीख-ए-फिरोजशाहीमध्ये लिहिलं गेलं आहे की, लग्नाच्या वरातींमध्ये खास करून रात्रीच्या वेळी फटाके उडवले जात होते. तर पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला दारूगोळा वापरण्याची टेक्निक चिनी व्यापारी जहाजांच्या माध्यमातून दक्षिण भारतापर्यंत पोहोचली होती. ज्याचा वापर जमोरीन आणि इतर लोकांनी फटाके बनवण्यासाठी केला. तेव्हा देखील युद्धामध्ये हत्यार म्हणून याचा वापर केला गेला नव्हता. तर काही इतिहासकार सांगतात की, मुघलांच्या अगोदर भारतामध्ये आलेले पोर्तुगीज देखील फटाक्यांचा वापर करत होते. विजापूरचा आली आदिलशहाच्या पंधराशे सत्तरच्या मुजुमुलुम या रचनेमध्ये फटाक्यांचा उल्लेख आढळतो.
मुघलांनीच भारतामध्ये फटाके आणले असं जरी खात्रीशीर दावा केला जाऊ शकत नसला तरी देखील अनेक इतिहासकारांच्या मते मुघलांच्या काळामध्ये फटाक्यांचा वापर वाढल्याचं सांगितलं जातं. यामधील किंग्स कॉलेज लंडनचे शिक्षक डॉक्टर कॅथरिन बटलर स्कोफिल्ड यांचं देखील म्हणणं आहे की, मुघल आणि त्यांच्या समकालीन राजपूत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा वापर करत होते, या फटाक्यांचा वापर ज्या ऋतूमध्ये किंवा महिन्यांमध्ये जास्त अंधार असायचा त्यावेळी केला जायचा. तसेच मुघल शासक शाहजहां आणि त्यानंतर औरंगजेबच्या काळात विवाह, जन्मदिन, राज्याभिषेक आणि लग्नाच्या वरातींमध्ये फटाके वाजवले जात असल्याचे वर्णन सापडतं. याची काही पेंटिंग्स देखील आढळले आहेत. तसेच दारा शिकोहच्या लग्नामध्ये देखील फटाके वाजवल्याचे पेंटिंगमध्ये पाहायला मिळतं.
त्याचबरोबर फटाक्यांच्या इतिहासाचा आणखी एक दाखला मिळतो. तो म्हणजे इतिहासकार आणि मुघल साम्राज्याचे वजीर राहिलेले अबुल फजल यांचं पुस्तक आईन- ए- अकबरीच्या पहिल्या खंडामध्ये म्हटलं आहे की आग आणि प्रकाश यांची पूजा धार्मिक कर्तव्य त्याचबरोबर देवाची स्तुतीकरण असतं. त्यामुळेच 18 व्या आणि 19 व्या शतकामध्ये बंगाल आणि आयोध्या येथे दुर्गापूजन आणि दिवाळी यासारख्या सणांना संरक्षण देत आतषबाजीचं आयोजन देखील केले जात होतं.
कॅथरिन बटलर स्कोफिल्ड यांच्या म्हणणं आहे की, अठराव्या शतकाच्या शेवटी दिवाळी आणि आकाशबाजी एक समीकरण बनलं याचा दाखला देणाऱ्या अनेक पेंटिंग्स देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये लखनऊ येथे नवाबी पेंटिंग तर मुर्शिदाबाद आणि कोलकाता या ठिकाणी दुर्गा पूजेमध्ये आतषबाजी केल्याचे युरोपियन पेंटिंग्स उपलब्ध आहेत. त्यामुळे मंडळी फटाक्यांचा शोध कोणी लावला किंवा भारतात फटाके कधीपासून आले याची खात्रीशीर माहिती नसली तरी देखील अनेक जुन्या दस्तावेज आणि पेंटिंग्समध्ये भारतामध्ये प्राचीन काळापासून आनंदोत्सव आणि सण उत्सव साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर केला जात असल्याचं दाखले मिळतात यावर मंडळी तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा.