असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. पण हे सर्व स्वतःच्या कमाईवर करत असाल तर त्याला महत्त्व असतं. मात्र, आता आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोत जी तुमचं लक्ष वेधून घेईल. अमेरिकेतील एफबीआयचे संचालक काश पटेल आणि त्यांची मैत्रीण, कंट्री सिंगर व कमेंटेटर अॅलेक्सिस विल्किन्स, हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माजी एफबीआय अधिकारी काइल सिराफिन यांनी केलेल्या दाव्यानुसार काश पटेल यांनी सरकारी जेटचा गैरवापर करून अॅलेक्सिस विल्किन्ससोबत प्रवास केला.
विशेष म्हणजे अॅलेक्सिस विल्किन्स ही इस्रायलसाठी 'हनीपॉट स्पाय' म्हणून काम करते असा आरोप देखील माजी एफबीआय अधिकारी काइल सिराफिन यांच्याकडून करण्यात आला. यावर काश पटेल यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. 26 वर्षीय अॅलेक्सिस विल्किन्स ही अर्कान्सा येथे वाढलेली आणि सध्या नैशविल येथे राहणारी कंट्री गायिका व राजकीय कमेंटेटर आहे. विल्किन्स आणि काश पटेल हे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये असून, दोघांची ओळख नैशविलमधील एका कार्यक्रमात झाली.
नेमके आरोप काय जाणून घ्या?
काइल सिराफिन यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये आरोप केला की, 25 ऑक्टोबर रोजी पेनसिल्वेनियातील एका कुस्ती स्पर्धेत राष्ट्रगीत गाण्यासाठी उपस्थित असलेल्या अॅलेक्सिस विल्किन्सला भेटण्यासाठी काश पटेल यांनी 60 दशलक्ष डॉलर्स किमतीचे सरकारी विमान वापरले. तसेच विल्किन्स इस्रायली गुप्तहेर असून अमेरिकन जनतेची फसवणूक केली जात असल्याचा दावा सिराफिन यांनी केला. यावर काश पटेल यांनी हे सर्व आरोप “भेकडपणाचे आणि लाजिरवाणे” असल्याचे म्हटले. एवढचं नव्हे सिराफिन यांच्या आरोपांविरोधात अॅलेक्सिस विल्किन्सने मानहानीचा दावा दाखल केला आहे.