मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीकडून प्रचाराचा आक्रमक सूर पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने वरळी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “गिरणी कामगार हद्दपार कोणामुळे? हे पाप नेमकं कोणाचं?” असा थेट सवाल करत फडणवीसांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनेक विकासकामांना स्थगिती देण्याचं काम कोणी केलं, असा प्रश्न विचारला तर जनतेकडून एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जेवढा विकास मिळाला, तो त्यांच्या काळात का मिळाला नाही?” असा सवाल करत त्यांनी कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, बीडीडी चाळींचा पुनर्विकास यांचा उल्लेख केला. “कोणीही सांगेल, पब्लिक है, सब जानती है,” असे म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.
फडणवीस पुढे म्हणाले की, गिरणी कामगारांच्या नावावर ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या 70 हजारांच्या रिसिट्सचा नेमका उपयोग काय? त्या दोन-चार हजार कोटी रुपयांत गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळालं असतं. “मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर हवं आहे,” असं ठामपणे सांगत त्यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला. “बी डीडी चाळी बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आम्ही वाचवल्या. नाहीतर 80 हजार मराठी माणसं मुंबईतून हद्दपार झाली असती,” असा आरोप त्यांनी केला.
या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारच्या गृहनिर्माण धोरणाचाही उल्लेख केला. “एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरिकांना घरं दिली, या योजना आजही सुरू आहेत. घरांच्या प्रश्नावर आम्ही काम करत आहोत,” असं त्यांनी सांगितलं. “आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला, गिरणी कामगार बाहेर फेकला गेला, याचं पाप नेमकं कोणाचं?” असा सवाल करत फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या आक्रमक भाषणामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.