थोडक्यात
राजकारणातील रिअल हिरो कोण?
अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर
रिअल हिरोच्या रुपात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) साठी एक विशेष मुलाखत दिली. विशेष म्हणजे, ही मुलाखत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने घेतली. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील रिअल हिरो कोण, असा प्रश्न विचारला, ज्यावर देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले.
आज जर आपण भारताला पाहिलं, तर भारताच्या पूर्ण राजकीय इतिहासात आम्हाला रिअल हिरोच्या रुपात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतात. कारण ते जे बोलतात तेच करतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक केले. आपण पाहिले तर भारतात गरीबी हटाओ अशी घोषणा वारंवार देण्यात आली. पण १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम हे मोदींनी केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण ‘फ्रेजाइल फाइव्ह’ इकोनॉमीतून पहिल्या पाच इकोनॉमीत आलो आहोत. आता आपण जगभरातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. यानंतर आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थाही बनलो आहोत. आज टेक्नोलॉजी, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचे क्षेत्र असो किंवा मग AVGC चे क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात भारत हा जगाशी स्पर्धा करत आहे. त्यामुळे मला असे वाटते की आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा भारत देश किती महान होता, याची गोष्ट ऐकत आलो आहोत. पण भारत महान कधी होणार हे आपल्याला कोणीही सांगत नव्हते. आता आपल्याला माहिती आहे की आपण त्या मार्गावर चालत आहोत. २०४७ मध्ये विकसित भारताचे चित्र हे आता आपल्या समोर आहे. ते चित्र उभं करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.