मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू असून आज, सोमवार १६ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची घोषणा होणार आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते पदांच्या निवडीकडे लागले आहे. बहुचर्चित निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार करत सत्ता मिळवली. त्यानंतर महापौरपदी भाजपच्या Ritu Tawde तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) चे Sanjay Ghadi यांची निवड झाली.
आजच्या विशेष सभेत विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते पदांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. परंपरेनुसार सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची निवड सभागृहनेतेपदी होते, तर विरोधी पक्षातील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या गटनेत्याची निवड विरोधी पक्षनेते म्हणून केली जाते. त्यामुळे भाजपचे गटनेते Ganesh Khankar यांची सभागृहनेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या गटनेत्या Kishori Pednekar यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित मानले जात आहे. महापौरांना दोन्ही पक्षांकडून अधिकृत पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार सभागृहात या नावांची घोषणा केली जाईल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांना आज अंतिम स्वरूप मिळणार आहे.
समित्यांमधील सदस्यांची घोषणा
आज स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावेही जाहीर केली जाणार आहेत. या समित्यांवर विविध पक्षांचे प्रतिनिधित्व पुढीलप्रमाणे असेल:
स्थायी समिती (एकूण 26 सदस्य):
भाजप – 10, शिवसेना (शिंदे) – 04, शिवसेना (ठाकरे) – 07, काँग्रेस – 03, मनसे – 01, एमआयएम – 01
सुधार समिती (एकूण 26 सदस्य):
भाजप – 10, शिवसेना (शिंदे) – 04, शिवसेना (ठाकरे) – 07, काँग्रेस – 03, मनसे – 01, एमआयएम – 01
शिक्षण समिती (एकूण 22 सदस्य):
भाजप – 09, शिवसेना (शिंदे) – 03, शिवसेना (ठाकरे) – 06, काँग्रेस – 02, एमआयएम – 01
बेस्ट समिती (एकूण 16 सदस्य):
भाजप – 06, शिवसेना (शिंदे) – 02, शिवसेना (ठाकरे) – 05, काँग्रेस – 02, एमआयएम – 01
समित्यांवरील सदस्यांची घोषणा झाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. मुंबई महानगरपालिकेतील या घडामोडींमुळे शहराच्या विकास आराखड्याला नवे दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील समन्वयावर आगामी काळातील कामकाजाची गती अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आजची घोषणा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.