थोडक्यात
विरोधी पक्षांनी राज्य व मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेतली.
अनेक नेत्यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला चांगलेच झापले.
सध्या राज्यात मतदार याद्यांवरुन मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे वारंवार समोर येत होते. तसेच मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती आणि खोटी मतदार नोंदणी यावरही आक्षेप घेतला जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सध्या महाराष्ट्र आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग बैठक सुरु आहे.
या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप), शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. आता या बैठकीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले.
राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयोगासोबत सुरु असलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप), शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच झापले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. आम्ही कुणाशी बोलू? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ठराविक लोकांसाठी घेतलेली निवडणूक असे जाहीर करा – उद्धव ठाकरे
जर त्रुटीसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता? त्यापेक्षा थेट ठराविक लोकांसाठी घेतलेली निवडणूक असे जाहीर करुन टाका, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळावर अनेक मुद्दे उपस्थित केले. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या, त्यावर काम झाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवले. दुबार मतदार आहेत, तुमची यंत्रणा सज्ज नाही,” अशी तक्रार केली.