Sanjay Raut Vs Narayan Rane शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर तीव्र शब्दांत टीका केली. राणेंनी अलीकडे केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी त्यांच्यावर बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला.
राऊत म्हणाले, “हे सगळे आहेत ना नारायण राणे, देवेंद्र फडणवीस वगैरे… हे सगळे दहीहंडीचे वीर आहेत. सध्या सगळे भाजपच्या हातातली मुरली वाजवत फिरतात. भारतीय जनता पक्षामध्ये ते मेहरबानीवर जगतात. जसं एखाद्याला वृद्धाश्रमात टाकून जगवलं जातं, तसं हे लोक कृत्रिम ऑक्सिजनवर जगतात.”
शिवसेनेचं “दुकान बंद” करण्याबाबत राणेंनी केलेल्या विधानावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029 च्या निवडणुकीत कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होतंय, हे लोकांना तेव्हा कळेल. त्यामुळे अशा प्रकारची उथळ भाषा करणं त्यांना शोभत नाही.”
पुढे ते म्हणाले की, “त्यांनी ती जुनी भाषा करू नये. ती भाषा शिवसेनेत असताना शोभायची. शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले, मग तिथून इतर पक्षांत गेले, आता भाजपमध्ये आहेत. पण ही भाषा त्या पक्षांमध्ये शोभत नाही. लोक हसतात. ही भाषा फक्त शिवसेनेतच शोभते.”