राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तीन खाती बहाल केली आहेत. त्यामध्ये क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क तसेच अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ या खात्यांचा समावेश आहे. मात्र, दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थ व नियोजन खाते सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. सध्या अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प हा थेट मुख्यमंत्र्यांकडून मांडला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते का देण्यात आले नाही?
सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते न देण्यामागचे कारणही समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या प्रशासकीय अनुभवाची कमतरता आहे. अशा परिस्थितीत, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना आणि अवघ्या काही दिवसांत राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा असताना, इतके महत्त्वाचे खाते नव्याने जबाबदारी घेणाऱ्या नेत्याकडे देणे जिकिरीचे ठरू शकते.
याशिवाय, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाची प्राथमिक तयारी अजित पवार यांच्याकडून जवळपास पूर्ण करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पाच्या अंतिम टप्प्यात शेवटच्या क्षणी बदल, सुधारणा आणि समन्वय साधणे आवश्यक असते. अशा स्थितीत अचानक खातेबदल झाल्यास प्रशासनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळेच सध्या अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीसोबत समन्वय कायम
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी समन्वय राखतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते ठेवण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढील काळात अर्थ व नियोजन खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे हा निर्णय तात्पुरता असल्याचे मानले जात आहे.