दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण. पण या उत्सवाची सुरुवात जी खास पारंपरिक दिवशी होते. ती म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे उठून उटणे लावणे, अभ्यंगस्नान करणे आणि एक विशेष रीत म्हणून कारीट नावाचं कडवट फळ पायाने फोडणे ही परंपरा आजही महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. मात्र अनेकांना यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांची माहिती नसते.
नरकासुराच्या वधाशी निगडीत परंपरा
पुराणकथांनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या क्रूर आणि अत्याचारी राक्षसाचा वध केला होता. नरकासुराने हजारो स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते आणि संपूर्ण सृष्टीवर त्याचे अत्याचार सुरू होते. देवांनी श्रीकृष्णाकडे मदतीची याचना केली आणि अखेर श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून सृष्टीला मुक्त केले.
नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्याने एक शेवटची विनंती श्रीकृष्णाकडे केली "या दिवशी जे मंगलस्नान करतील, त्यांना नरकयातना भोगावी लागू नये." भगवान श्रीकृष्णाने ही मागणी मान्य केली आणि तेव्हापासून आश्विन वद्य चतुर्दशी 'नरक चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाऊ लागली.
कारिट फोडण्यामागील प्रतीकात्मकता
या दिवशी 'कारीट ' हे लहान, कडवट आणि कडक साल असलेलं फळ, डाव्या पायाच्या अंगठ्याने तुडवून फोडलं जातं. हे फळ नरकासुराचं प्रतीक मानलं जातं. ते पायाने फोडणं म्हणजे नरकासुरावर विजय मिळवणं, अहंकाराचा, नकारात्मकतेचा आणि दुष्टतेचा नाश करणं असं मानलं जातं.
कारिट फोडणं केवळ एक धार्मिक विधी नाही, तर त्यामागे एक गहन अध्यात्मिक संदेश दडलेला आहे. जीवनातील कटुता, द्वेष, राग, मत्सर यांचा त्याग करून दिवाळीच्या शुभ आणि आनंदमय वातावरणात प्रवेश करणं, ही या परंपरेची खरी भावना आहे.
शरीर आणि मनाची शुद्धता - अभ्यंगस्नानाचे महत्त्व
कारीट फोडल्यानंतर घरातील मंडळी अभ्यंगस्नान करतात. उटणे लावून शारीरिक शुद्धता केली जाते. यानंतर घरातील स्त्रिया सर्वांना उटणे लावतात, कपाळावर कुंकवाचा टिळा लावून नवीन सुरुवातीची जाणीव करून देतात. गोड फराळ, दीपमालिका आणि हास्यविनोदांनी यानंतरचा दिवस साजरा केला जातो.
नरक चतुर्दशीला कारिट फोडण्याची परंपरा ही केवळ एक धार्मिक रीत नाही, तर ती आपल्या जीवनातील नकारात्मकतेचा अंत करून सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचं प्रतीक आहे. कटुता फोडून गोडतेकडे जाण्याचा आणि दिवाळीचा खरा अर्थ समजून घेण्याचा तो एक सुंदर मार्ग आहे.