आज संपूर्ण देशात मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वर्षातील पहिला सण म्हणून ओळखली जाणारी मकरसंक्रांत ही केवळ धार्मिकच नाही, तर आरोग्यदायी परंपरांचा संगम मानली जाते. या सणाचा केंद्रबिंदू म्हणजे तीळ आणि गूळ. “तीळगुळ घ्या, गोड गोड बोला” हा संदेश देणारा हा सण सामाजिक सलोखा वाढवतो, त्याचबरोबर शरीराला उर्जा देणारा आहारही पुरवतो. भारतीय सण-उत्सवांचे वैशिष्ट्य म्हणजे ऋतुचक्राशी सुसंगत आहारपद्धती. हिवाळ्याच्या कडाक्यात शरीराला उष्णता आणि ताकद देणाऱ्या पदार्थांची गरज असते. त्यासाठीच मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, चिकी, पोळी असे पदार्थ बनवले जातात. तिळाचे मुख्यत्वे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असून दोन्ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
आयुर्वेदानुसार तीळ हे उष्ण, पचायला जड, बलवर्धक आणि अग्निदीपक मानले जातात. तिळामध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, सेलेनियम आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. पांढरे तीळ चावून खाल्ल्यास शरीराची ताकद वाढते, हिरड्या मजबूत होतात आणि पचन सुधारते. तिळाच्या तेलाने रोज अभ्यंगस्नान केल्यास थकवा, वातदोष, अकाली वृद्धत्व कमी होते. तसेच त्वचा मऊ राहते, केस मजबूत होतात आणि दृष्टी सुधारते.
तिळाचा काढा सर्दी-खोकल्यावर गुणकारी ठरतो. मासिक पाळीच्या वेदना, अनियमित पाळी, कंबरदुखी यावरही तिळ आणि गूळ यांचे मिश्रण लाभदायक ठरते. दह्याच्या निवळीत तीळ घेतल्यास लघवीची जळजळ कमी होते. गूळ हा स्वच्छ, उष्ण आणि पथ्यकारक पदार्थ मानला जातो. जुना गूळ रुचकर व आरोग्यदायी असतो, तर नवीन गूळ कफ वाढवू शकतो. गुळाचे पदार्थ तुपासोबत घेतल्यास शरीरावर उष्णतेचा विपरीत परिणाम होत नाही. पूर्वी पाहुणचारासाठी गूळपाणी देण्याची प्रथा होती, ज्यामुळे थकवा दूर होत असे. म्हणूनच मकरसंक्रांतीला तीळगुळ खाण्याची परंपरा केवळ चवीसाठी नसून, ती आरोग्य, ऋतू आणि जीवनशैलीशी घट्ट जोडलेली आहे.