नवरात्रोत्सव सध्या राज्यभरात सुरु आहेत. काल देवी प्रत्येकांच्या घरी विराजमान झाली. अनेकांच्या घरी घटस्थापना करण्यात आली आहे. पण नवरात्री का साजरी केली जाते किंवा दुर्गादेवीला महिषासुर-मर्दिनी असे का म्हणतात अशी प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर आता जाणून घेऊया दुर्गादेवीला महिषासुर -मर्दिनी का म्हणतात तर...
एके काळी एक महिषासुर नावाचा राक्षस राजा होता. तो अत्यंत बलवान असल्याने त्याला तिन्ही लोकांवर (म्हणजे असुरांचा पाताळलोक, मानवांचा भुलोक आणि देवांचा स्वर्गलोक) अधिपत्य गाजवण्याची इच्छा होती. त्याला अमर राहण्यासाठी त्यांने अनेकवर्ष कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवांना म्हणाला की, मला अमर व्हायचे आहे.
त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की, “असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच येते. तुला मरण कसे यावे हे मात्र तु ठरवु शकतोस.” महिषासुराने सांगितले कि मला एखाद्या स्त्रीच्याच हातुन मरण यावे. अन्य कोणाच्याही नाही.” ब्रह्मदेव तथास्तु म्हणुन अंतर्धान पावले. महिषासुर प्रचंड आनंदित झाला. पुरुष योद्धे लढले तर लढले परंतु आपल्याशी लढु शकेल अशी स्त्री अस्तित्वातच नाही, असा त्याला विश्वास होता. बलवान तर तो होताच पण आता या वरामुळे आपल्याला कोणीही मारू शकत नाही या आत्मविश्वासाने तो पेटून उठला. त्याने असुरांचे सैन्य घेऊन तिन्ही लोक काबीज केले आणि आपले राज्य प्रस्थापित केले. पण तो इथेच थांबला नाही. त्याच्या बळाचा गर्व आता त्याच्यावर हावी झाला होता. त्याला कमजोर लोकांवर आपल्या बळाचा प्रयोग करून त्रास देण्यात आनंद येत होता. त्याला रोखायला कोणीही समोर येत नव्हते. त्याने सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळे आणले.
आता दिवस उगवेल कधी, मावळेल कधी, भरती ओहोटी, पाऊस पाणी कशाचाच नेम राहिला नाही. समस्त मानव त्रस्त झाले होते. इंद्र देवांना घेऊन ब्रह्मदेवाला भेटायला गेले. तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णु तिथेच होते. देवांनी सर्वांची व्यथा मांडली. त्रिदेवांच्या मनात एकाच वेळी महिषासुराला संपवायलाच हवे हा विचार आला आणि त्यातुन एक ऊर्जा प्रकट झाली. ह्या ऊर्जेने दुर्गादेवीचे रूप घेतले. महादेवांनी तिला आपल्यासारखे त्रिशुळ दिले. विष्णूंनी आपल्यासारखे चक्र दिले. सर्व देवांनी आपापल्या परीने आयुधे दिली, आणि शक्ती प्रदान केली. दुर्गादेवी एका वाघावर बसुन निघाली.
महिषासुराचा अत्याचार थांबवण्यासाठी दुर्गादेवी वाघावर बसून त्याच्या महालाजवळ आली. तिच्या गर्जनेने सगळीकडे थरकाप उडाला. सौंदर्य पाहून महिषासुराने तिला लग्नाची मागणी पाठवली, पण देवीने ठामपणे नकार दिला आणि सांगितले, “मी तुझे अत्याचार संपवायला आले आहे.” महिषासुराने वीर, सैन्य आणि शेवटी स्वतः युद्धात उतरून देवीवर हल्ले केले. त्याने अनेक रूपे घेतली. पण देवीने सर्व हल्ले परतवले. शेवटी देवीने त्रिशूळाने त्याचा वध केला. जग अन्यायमुक्त झाले आणि देवीला “महिषासुर-मर्दिनी” असे गौरवनीय नाव मिळाले.