थोडक्यात
दावोस दौऱ्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही - आदित्य ठाकरे
दावोसमध्ये करार झालेल्या २९ पैकी २० कंपन्या महाराष्ट्रातल्या तर १५ कंपन्या मुंबईतल्या
या कंपन्यांना सामंजस्य करार करण्यासाठी दावोसला का नेण्यात आले?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरम दरम्यान झालेल्या करारांवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, "दावोस दौऱ्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही आणि या दौऱ्यात जे करार झाले ते राज्याच्या विकासासाठी किती उपयुक्त आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आवश्यक आहे."
...मग करारांसाठी दावोसला का गेले? - आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच ७ आयएएस अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर गेले होते. परंतु आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरील काही मुद्द्यांवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, "आम्ही कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत करतो, पण दावोसच्या दौऱ्याचा प्रभाव आणि त्याचे नियोजन योग्य होते का? ५४ कंपन्यांपैकी ४३ भारतीय कंपन्या असून ३१ महाराष्ट्रातील आहेत. मग या करारांसाठी दावोसला का गेले?" त्यांनी स्पष्ट केले की, "सामंजस्य करारांचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी या करारांची अंमलबजावणी आणि त्यांचे राज्यातील विकासावर होणारे परिणाम यावर अधिक विचार करण्याची गरज आहे."
महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या उद्घाटनावेळी उद्योगमंत्री कुठे होते? - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्र्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केले. "उद्योगमंत्री उशिरा दावोसला पोहोचले, आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पॅव्हेलियनचे होणाऱ्या उद्घाटनाचा कार्यक्रम चुकवला. एखादा मंत्री आपल्याच विभागातील इतका महत्त्वाचा कार्यक्रम कसा चुकवू शकतो" असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्योगमंत्र्यांच्या फोटोंमधून शंका घेतली आणि एक दिवसात दौरा पूर्ण करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर काही बैठकांच्या फोटोमध्ये ते दिसले आणि त्यानंतर ते कुठे गेले? ते खासगी दौऱ्यावर गेले का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही, करदाते म्हणून, बर्फातील १ दिवसाच्या सुट्टीसाठी पैसे का द्यावे लागतील? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
उद्घाटनाचा कार्यक्रम चुकवून, काही बैठकांमध्ये उपस्थित राहून, उद्योगमंत्री उदय सामंत १ दिवसांत दौरा आटपून गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जर मुख्यमंत्री ४ दिवस दावोसमध्ये राहू शकतात, तर उद्योगमंत्र्यांना एका दिवसात दावोस सोडण्यास का भाग पाडले? त्याला परत बोलावणारे नाराज यूडी मंत्री (अर्बन डेव्हलपमेंट मिनीलस्टर एकनाथ शिंदे) होते का? त्यांना शिष्टमंडळाने परत पाठवले होते का? असे सवाल उपस्थित केले आहेत.
अशा फोरम्सकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलण्याची वेळ आली आहे. हे केवळ अधिक संख्येने सामंजस्य करार करण्यापुरताच मर्यादित नसून ते जागतिक स्तरावर आणि संवादासाठी दावोस हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जिथे मुख्यमंत्र्यांनी (कोणत्याही पक्षाच्या) महाराष्ट्राला स्थान दिले पाहिजे! असं मत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्यक्त केलं आहे.