राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, सकाळच्या सुमारास दाट धुकं आणि रात्रीच्या वेळेस उकाडा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून, हवामान विभागाने आज (२३ जानेवारी) राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात चढ-उतार दिसून येणार आहेत. सकाळी थंडीचा गारठा जाणवेल, तर दुपारनंतर उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत किमान तापमानात घट झाली असली, तरी आजही हा बदल कायम आहे. पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. धुळे, नाशिक आणि निफाड या भागांत किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेल्याने थंडी कमी झाली असून, अनेक ठिकाणी उकाड्याची भावना वाढताना दिसत आहे.
सकाळी दाट धुक्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. महामार्गांवर दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. रात्री आणि पहाटे धुके, दुपारी ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण, असा हवामानाचा लहरीपणा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. तापमानातील सततच्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.
दरम्यान, या बदलत्या हवामानाचा फटका शेतकरी वर्गालाही बसत आहे. ढगाळ वातावरण, अनिश्चित पाऊस आणि तापमानातील चढ-उतार यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. काही भागांत काढणीला आलेल्या पिकांवर धोका निर्माण झाला असून, शेतकरी चिंतेत आहेत. एकंदरीत, राज्यात सध्या हवामान अस्थिर असून पुढील काही दिवस नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे लक्ष देत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.