थोडक्यात
रशियाच्या तेलावरील मोठे राजकारण सध्या सुरू
अमेरिकेचा भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ
भारताला कोंडीत पकडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, (Russia oil export ban)याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम अमेरिकेचे सुरू आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरीही भारताने अमेरिकेचा अटी मान्य केल्या नाहीत. जगात चीननंतर भारत हा रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करतो आणि हीच पाटदुखी डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना पत्र लिहित म्हटले की, जोपर्यंत चीन हा रशियाकडून तेल खरेदी बंद करत नाही, तोपर्यंत चीनवर निर्बंध लादा 50 किंवा 100 टक्के टॅरिफ लावा. भारतालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे.
रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे. सध्याच्या घडीला रशिया हा अनेक देशांना तेल निर्यात करतो. मात्र, आता रशियाने तेल निर्यातीवर तात्पुरती बंदी घातल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. अमेरिका रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी भारतासह चीनवर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामध्येच आता रशियाने तेल निर्यातीवर तात्पुरती बंदी घोषित केल्याने अनेक देशांची झोप उडालीये.
रशियाने स्पष्ट केले की, डिझेल निर्यातीवर वर्षाच्या अखेरपर्यंत बंदी घालत आहोत. पेट्रोल निर्यातीवरील बंदी डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी यावर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या रिफायनरीजना मोठे नुकसान झाले. त्यामुळे इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण होतोय. यामुळेच रशियाने तेल निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रोन हल्ल्यांमध्ये युक्रेनने रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना टार्गेट केले होते आणि मोठे नुकसान देखील झाले. रशियाचे उपपंतप्रधान यांनी यावर बोलताना म्हटले की, रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांवर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे पेट्रोलियम उत्पादनांची थोडीशी कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, ही कमतरता आम्ही भरून काढू आणि ही समस्या लवकर सोडवली जाणार आहे. या बंदीचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही. रशियाकडून तेल खरेदी करणारा भारत हा मोठा ग्राहक आहे.