महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे या घडामोडींचे केंद्रबिंदू ठरत आहे बारामती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तब्बल तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी पक्षाच्या भवितव्याबाबत गंभीर मंथन झाल्याचे बोलले जात आहे.
या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील मंथन हॉल येथे आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकी कोणती घोषणा करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. विलिनीकरणाबाबत ठोस निर्णय जाहीर होणार की केवळ चर्चांना पूर्णविराम देण्यात येणार, याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही पाहायला मिळत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, जर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या, तर राज्याच्या राजकारणात मोठे उलथापालथी घडू शकतात. विशेषतः आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बारामती ही शरद पवार आणि अजित पवार यांची राजकीय कर्मभूमी असल्याने, याच ठिकाणी एकत्र येण्याची घोषणा झाल्यास त्याला प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त होईल.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्ते आणि नेते या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. काही ठिकाणी आशावादी वातावरण असले, तरी काही नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आज दुपारी होणारी पत्रकार परिषद ही केवळ राष्ट्रवादीसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही दिशा ठरवणारी ठरू शकते, असे चित्र सध्या दिसून येत आहे.