राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र यंदाच्या पालिका निवडणुकीत सर्व वॉर्डची मतमोजणी एकाचवेळी न होता, एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होण्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास मोठा उशीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील निवडणूक निकालांचा सस्पेन्स वाढणार असल्याचे चित्र आहे.
निवडणूक प्रक्रियेप्रमाणे 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी करण्यात येणार असून, त्यानंतर वॉर्डनिहाय मतमोजणी होणार आहे. मात्र एका वेळी फक्त एकाच वॉर्डची मतमोजणी केली गेली, तर ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ ठरण्याची शक्यता आहे. प्रत्येक वॉर्डची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी साधारण एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे ज्या महापालिकांमध्ये प्रभागांची संख्या मोठी आहे, तिथे निकाल रात्री उशिरापर्यंतही स्पष्ट होतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यामुळे मतमोजणी केंद्रांवर उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणावर ताटकळत राहावे लागण्याची शक्यता आहे. काही लहान महापालिकांमध्ये संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट होऊ शकतात, मात्र मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या मोठ्या महापालिकांचे निकाल हाती येण्यास मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो.
देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 227 प्रभाग आहेत. मुंबईत 23 विभागीय निवडणूक कार्यालयांअंतर्गत मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक कार्यालयांतर्गत 8 ते 10 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. टपाली मतदान मोजल्यानंतर EVM वरील मतमोजणी सुरू होईल. मात्र एकावेळी एकच प्रभाग मोजण्याची पद्धत राबवली गेली, तर संपूर्ण प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतमोजणी प्रक्रियेला होणारा उशीर पाहता पोलिस यंत्रणा आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, संभाव्य वाद, हरकती आणि गोंधळ यामुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक जिकिरीची ठरू शकते, असे मत उमेदवार आणि राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे मतमोजणीची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पालिकांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.