नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनावर संकट उभे ठाकले आहे. एक वर्षांपूर्वी केलेल्या कामाचे कंत्राटदारांनी थकलेले देयक मिळत नसल्याचे बघत पुन्हा काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी झालेल्या कामांचे १५० कोटी रुपये थकीत असताना सरकारकडून फक्त २० कोटी रुपये वाटप झाल्यामुळे नाराज ठेकेदारांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. परिणामी, सार्वजनिक बांधकाम विभागासमोर १ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाइन गाठण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
१५० कोटी रुपयांची थकबाकी नागपुरातील मागील हिवाळी अधिवेशन कामांचे आहे. आगामी अधिवेशनासाठी ९३.८४ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. महिन्याच्या सुरुवातीला ठेकेदारांनी अनेक दिवस कामबंद ठेवले.. त्यानंतर पीडब्ल्यूडी आणि राज्य सरकारने आश्वासन देत सांगितले की, थकबाकी लवकरच मिळेल. मात्र, गुरुवारी पीडबल्यूडीला या खात्यातून फक्त २० कोटी रुपये मिळाले. ठेकेदारांच्या आपत्कालीन बैठकीत कामबंदचा निर्णय घेण्यात आला.