लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर यावेळी येथे दिलीप धोत्रे उपस्थित होते.
यावेळी दिलीप धोत्रे "गरिबी, संघर्ष, शिक्षण, राजकारण, उद्योग आणि समाजकारण या सगळ्या टप्प्यांतून मी आलो आहे. पण माझं आजचं स्वप्न एकच आहे – पंढरपूरचा आणि महाराष्ट्राचा विकास आणि राज ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालेलं पाहणं." – असं स्पष्ट आणि ठाम मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप सुबाई काशिनाथ धोत्रे यांनी व्यक्त केलं.
"1993 मध्ये मी बीएससी फर्स्ट इयरला होतो. तिथे मी भारतीय विद्यार्थी सेनेकडून निवडणूक जिंकली. तिथूनच राजकारणाची सुरुवात झाली. शाखाध्यक्ष, उपशहराध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि आता राज्यस्तरीय नेता – हा प्रवास मी प्रामाणिकपणे केला आहे." असं ते म्हणाले. "मी आधी गरीब होतो. पण मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यामुळे आज मी यशस्वी उद्योजक झालो आहे. छोट्या छोट्या उद्योगातून सुरुवात करत मोठं साम्राज्य उभं केलंय." – त्यांनी आपल्या यशाचं गुपित सांगितलं.
दिलीप धोतरे यांनी महाराष्ट्रातील सहकार व्यवस्थेतील बिघाडांवर परखड भाष्य केलं. "सहकार समृद्धीकडे नेणारा मार्ग होता. पण आज सहकारच संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जिल्हा बँका बुडवल्या गेल्या आहेत. संचालकच बँका बुडवतात. आमच्या सोलापूर जिल्हा बँकेच्या 2200 कोटींच्या ठेवी गायब झाल्या आणि बँक आता प्रशासकीय ताब्यात आहे. हे सगळं कुणी बघणार?" – असा सवाल त्यांनी थेट केंद्र सरकारकडे केला. त्यांनी हेही सांगितलं की, "सहकारी साखर कारखाने बुडत आहेत आणि खाजगी कारखाने यशस्वी होत आहेत. यातूनच प्रश्न निर्माण होतो की सहकार अपयशी का आणि खाजगी यशस्वी का?"त्यांनी सहकार राज्यमंत्र्यांना विनंती केली – "महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा बँक, साखर कारखाना आणि पतसंस्थेची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे."