आज, 20 जुलै रोजी नियोजित असलेला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मधील तिसरा महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार होता. मात्र, हा बहुचर्चित सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास नकार दिल्यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला.
हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण यांच्यासारख्या नामांकित माजी क्रिकेटपटूंनी थेट बहिष्काराची भूमिका घेतली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. या हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघातील खेळाडूंनी आपली राष्ट्रभक्ती दाखवत हा कठोर निर्णय घेतला.
भारतीय संघाचे नेतृत्व युवराज सिंग करत असून त्यांच्यासोबत शिखर धवन, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, सुरेश रैना यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान संघाचं नेतृत्व शाहिद आफ्रिदीकडे देण्यात आलं असलं, तरी पहिल्या सामन्यात मोहम्मद हफीजने कर्णधारपदाची भूमिका पार पाडली होती.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची नेहमीच मोठी चर्चा असते, पण देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः पहलगाम घटनेनंतर, या सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एप्रिल महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली होती. 7 ते 10 मेदरम्यान भारत-पाकिस्तान दरम्यान सीमारेषेवर तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांत तात्पुरता शांतता करार झाला होता.
या घटनांमुळे भारतातील जनमानस संतप्त असून, या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामना खेळवण्याचा प्रस्तावही लोकांनी नाकारला. अखेर भारतीय खेळाडूंच्या बहिष्कारामुळे आयोजकांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारत चॅम्पियन्स संघ :
शिखर धवन, रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), अंबाती रायुडू, गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णधार), युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, विनय कुमार, हरभजन सिंग, पीयूष चावला, सिद्धार्थ कौल, अभिमन्युन, वरुण अॅरोन
पाकिस्तान चॅम्पियन्स संघ :
कामरान अकमल (यष्टीरक्षक), शर्जील खान, उमर अमीन, मोहम्मद हफीज (कर्णधार), शोएब मलिक, आसिफ अली, सोहेब मकसूद, आमेर यामीन, सोहेल तन्वीर, सोहेल खान, वहाब रियाझ, रुम्मन रईस, अब्दुल रज्जाक, युनूस खान, शाहिद आफ्रिदी, मिश्रा-अहमद, अहमद-अफ्रिदी, सईद अजमल
हेही वाचा