यवतमाळ येथील शेतकऱ्याच्या बाबतीत एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. शेतकऱ्याला चक्क एका झाडाने रातोरात करोडपती बनवलं आहे. वाचून धक्का बसला ना? पण ही गोष्ट खरी आहे. यवतमाळमधील पुसद तालुक्यातील खुर्शी येथे राहाणाऱ्या केशव शिंदे हा शेतकरी करोडपती बनला आहे. पण हे नक्की काय झालं? आणि नेमका प्रकार काय आहे? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
नेमका प्रकार काय ?
समोर आलेल्या माहितीनुसार, 2013-14 मध्ये रेल्वेचा एक सर्व्हे झाला होता. त्यावेळी कर्नाटक येथील काही लोक रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींमुळे कुटुंबाला धक्का बसला होता. शिंदे यांच्या शेतात असलेले झाड हे रक्तचंदनाचे असलेले सांगितले होते. त्याचवेळी त्यांनी या झाडाचे मूल्य सांगितले पण रेल्वेने पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. दरम्यान शिंदे कुटुंबाने खासगी मूल्यांकन केले त्यावेळी त्याची किंमत तब्बल 4 कोटी 95 लाख रुपये असल्याचे सांगितले. मात्र रेल्वेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली. न्यायलायाने या झाडाच्या मूल्यांकणाच्या बदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र त्यातील आता 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
शिंदे यांच्या जागेमध्ये असलेल्या 100 वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला म्हणून 1 कोटी रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जमा करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचं मूल्यांकन करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहे.