येमेनमधील हौथी गटाने शनिवारी पुष्टी केली की राजधानी सना येथे झालेल्या इस्रायली हल्ल्यात त्यांच्या सरकारचे पंतप्रधान अहमद अल-रहावी यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात इतर काही मंत्रीही ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. हौथींच्या नियंत्रणाखालील प्रदेशात पंतप्रधान म्हणून काम पाहणारे अल-रहावी हे कार्यशाळेच्या वेळी लक्ष्य करण्यात आले. मात्र, किती मंत्री ठार झाले याबाबत गटाने नेमकी माहिती दिलेली नाही.
हौथी सर्वोच्च राजकीय परिषदेचे अध्यक्ष महदी अल-मशात यांनी व्हिडिओ संदेश जारी करताना सांगितले, “आम्ही या बलिदानाचा बदला घेऊ आणि जखमांतूनही विजयाचा मार्ग निर्माण करू.” इस्रायलने मात्र आपला हल्ला योग्य ठरवत सांगितले की, त्यांनी “हौथी दहशतवादी शासनाचे लष्करी तळ” उद्ध्वस्त केले आहेत. गाझातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधीच तणावग्रस्त असलेल्या मध्यपूर्वेत या घटनेमुळे अधिक अस्थिरता निर्माण झाली आहे.
अहमद गालेब अल-रहावी यांच्या मृत्यूबाबत हौथी गटाने निवेदनात म्हटले आहे की, “बदल व बांधणी सरकारचे पंतप्रधान आणि त्यांचे काही सहकारी गुरुवारी शहीद झाले.” गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलने हौथींच्या ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. कारण हौथी गट इस्रायलवर तसेच लाल समुद्र आणि अदनच्या आखातात पाश्चात्य जहाजांवर हल्ले करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे सर्व गाझातील पॅलेस्टिनींच्या समर्थनासाठी केले जात आहे.
अलीकडेच हौथींनी दक्षिण इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला होता. इस्रायलने ते अडवले असल्याचे सांगितले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हौथींच्या लष्करी केंद्रांवर आणि राष्ट्रपती भवनावरही हल्ला केला. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते की, फक्त लष्करी तळ उद्ध्वस्त करून हौथींच्या कारवाया थांबवता येणार नाहीत. त्यामुळे गटाच्या नेत्यांनाच लक्ष्य केले जाईल, जसे इस्रायलने हिझ्बुल्ला, हमास आणि इस्लामिक जिहादच्या नेत्यांवर केले आहे.