क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील तरुण क्रिकेटपटू फरीद हुसेन यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. 20 ऑगस्ट रोजी घडलेल्या या दुर्घटनेनंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, फरीद हुसेन हे दुचाकीवरून प्रवास करत असताना समोर उभ्या असलेल्या कारमधील व्यक्तीने अचानक दरवाजा उघडला. त्यावेळी हुसेन यांची दुचाकी त्या दाराला धडकली आणि ते रस्त्यावर आपटले. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. फरीद हुसेन हे स्थानिक पातळीवर लोकप्रिय क्रिकेटपटू होते. त्यांच्या खेळामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये आणि स्थानिक समाजात शोककळा पसरली आहे.
याआधीही काही नामांकित क्रिकेटपटूंचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अँड्र्यू सायमंड्स यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता, तर भारताचा युवा खेळाडू रिषभ पंत देखील एका गंभीर अपघातातून थोडक्यात बचावला होता. फरीद हुसेन यांच्या जाण्यामुळे क्रिकेट क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.