बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका युवकावा टोळक्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. शिवराज दिवटे या तरुणाला बीडमधील जलालपूर परिसरात 10 ते 12 तरुणांच्या टोळण्यांनी लाठी-काठीनं बेदम मारहाण केल्यांना बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. या टोळक्यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूला लोकं आल्यामुळे आपला जीव वाचला, असं जखमी शिवराज दिवटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. "तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करतो, याला सोडायचं नाही, याला मारून टाकायचं," असे ते मारहाण करणारे तरुण बोलत असल्याची माहिती शिवराज दिवटे यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 7 तरुणांना अटक केली आहे.
बीड जिल्ह्यात होणाऱ्या वारंवार मारहाणीच्या घटनांमुळे हा जिल्हा गुन्हेगारीचा केंद्र बनला आहे का, अशा चर्चा आता समोर येत आहेत. शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीची सामाजिक स्तरातील प्रतिनिधींनीदेखील दखल घेतली असून अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेची भेट घेतली. यामध्ये बजरंग सोनवणे, सुरेश धस, धनंजय मुंडे, मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांके पाटील यांचा समावेश आहे. शिवराज दिवटे पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश धस यांनी दिली. तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.