अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येप्रकरणी फरार आरोपी झिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात फरार असलेल्या महत्वाच्या आरोपींपैकी एक आरोपी म्हणून पोलीस झिशान अख्तरचा शोध बरेच दिवस घेत होते. झिशान हा बाबा सिद्दीकी च्या हत्त्येनंतर परदेशात पळुन गेला होता. आता त्याच्या अटकेनंतर सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या 12 ऑक्टोबर 2024 ला करण्यात आली होती. झिशान सिद्दिकी याच्या कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. बाबा सिद्दीकींचा बॉलीवूड स्टार सलमान खानशी जवळचा संबंध होता. अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय असल्यानं त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीकडून करण्यात आला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा झिशान अख्तर घटनास्थळी होता. नंतर बनावट पासपोर्ट च्या आधारे तो कॅनडा मध्ये पळुन गेला.
पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्याला पळून जाण्यास मदत केली होती. दरम्यान झीशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी असुन टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा 9 गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली होती . त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला. त्यानंतर तो भारत सोडून पळून गेल्याचं समोर आलं आहे. मात्र आता त्याला कॅनडामध्ये अटक केल्यानंतर त्याला आता भारतात आणले जाणार आहे. मुंबई मध्ये त्याला आणणार असुन त्याची कसुन चौकशी केली जाणार आहे. यामध्ये बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी अनेक महत्वाचे धागे दोरे हाती लागण्याची शक्यता आहे.