युक्रेनमध्ये रशियासोबत सुरू असलेल्या दीर्घकालीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी देशाच्या पंतप्रधानपदी युलिया ॲनाटोलिव्हना स्व्हिरिडेन्को यांची नियुक्ती केली आहे. त्या युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. आर्थिक धोरणांतील अनुभव, पारदर्शक प्रतिमा आणि युद्धकाळात देशाला दिशा देण्याची क्षमता यामुळे त्यांची निवड करण्यात आली.
युलिया स्व्हिरिडेन्को यांचा जन्म 25 डिसेंबर 1985 रोजी चेर्निहिव्ह येथे झाला. त्यांनी कायिव्ह नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेड अँड इकॉनॉमिक्समधून अँटी-मोनोपॉली व्यवस्थापनात पदवी घेतली आहे. 2008 पासून त्यांनी आर्थिक क्षेत्रात कार्य सुरू केले. नंतर त्यांनी चेर्निहिव्हमधील आर्थिक विकास विभागप्रमुख, कार्यवाहक राज्यपाल आणि उपपंतप्रधान पदांसह आर्थिक विकास व व्यापार मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या नेतृत्वात आर्थिक धोरण राबविण्यात आणि आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये युक्रेनचे प्रतिनिधित्व करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
17 जुलै 2025 रोजी Verkhovna Rada (युक्रेनियन संसद) मध्ये 262 खासदारांच्या समर्थनाने त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्या मावळते पंतप्रधान डेनिस श्मिहाल यांची जागा घेत आहेत. त्यांच्या नियुक्तीमागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे लष्करी औद्योगिक क्षमता वाढवणे, अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि जागतिक भागीदारांशी आर्थिक संबंध दृढ करणे हे आहेत.
युलिया यांच्यासमोर काही गंभीर आव्हाने आहेत. आंतरराष्ट्रीय मदतीत घट झाल्यामुळे सुमारे 19 अब्ज डॉलरचा आर्थिक तुटवडा भरून काढावा लागणार आहे. तसेच, झेलेन्स्की सरकारने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार लष्कराच्या किमान 50 टक्के गरजा देशांतर्गत शस्त्रनिर्मितीतून पूर्ण कराव्या लागतील.
स्व्हिरिडेन्को यांनी युक्रेनसाठी युद्धकाळात विलंब न करता कठोर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी संरक्षण उत्पादन, पुरवठा साखळी आणि आर्थिक आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे युक्रेनच्या राजकीय नेतृत्वात मोठा बदल झाला असून देशाच्या भवितव्यावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.