मुंबई महापालिका निवडणूक २०२६ च्या मतदानानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून, या अंदाजांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सर्व प्रमुख एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी निवडणूक झाली असून, सत्तेसाठी ११४ जागांचा आकडा गाठणं आवश्यक आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती १२० ते १४० जागांपर्यंत मजल मारू शकते, तर ठाकरे बंधूंची युती केवळ ६० ते ८० जागांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी आणि ‘कमळाबाई’ यांच्यात प्रदीर्घ बैठक झाल्याचा दावा केला आहे. या बैठकीत काय शिजले? असा सवाल उपस्थित करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील खास खजिनदार, लाडका बिल्डर आणि आयुक्त यांच्यातील चर्चेवर संशय व्यक्त केला आहे.
या पोस्टनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी उपरोधिक शैलीत टीका करत म्हटलं की, “त्याहून मोठी बातमी आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोठी बैठक झाली असून त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. त्यांनी आदित्य आणि अमित ठाकरे यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर संजय राऊतांना असे ट्विट करण्याचे आदेश देण्यात आले.” एकीकडे एक्झिट पोल, तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरील वाकयुद्धामुळे मुंबईच्या राजकारणात प्रचंड तापमान वाढलं आहे. आता सर्वांचे लक्ष १६ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं असून, एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्ष निकालात कितपत खरे ठरतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.