राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी राज्यात अभूतपूर्व दबाव, धमक्या आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचा दावा केला. “बंडोबा संध्याकाळपर्यंत थंडोबा होतील,” असा सूचक इशारा देत त्यांनी उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला.
राऊत म्हणाले की, “निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन उमेदवारांना जात आहेत. मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर सरकारी अधिकाऱ्यांचे ताफे उभे आहेत. आचारसंहिता असताना हा सगळा प्रकार सुरू आहे. ‘अर्ज मागे घ्या’ असे रो यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. हा लोकशाहीचा गळा घोटणारा प्रकार आहे.” त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “चार वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब कसे होते? याचं उत्तर कोणी देणार? निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे, पण ही सगळी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे.” त्यांनी महापालिका आयुक्तांनी यावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.
जळगावमध्ये एका उमेदवाराचे अपहरण झाल्याचा आरोप करत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. “राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? कल्याण-डोंबिवली कोणाच्या बापाची आहे का? इथे काय चाललंय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या दारात काल-परवा पक्षप्रमुखांची गर्दी लागल्याचा उल्लेख करत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर दबाव असल्याचा आरोप पुन्हा केला.
केडीएमसी निवडणुकीसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, “धमक्या सर्वत्र येत आहेत, पण आम्ही धमक्यांना भीक घालणारे नाही. मुंबई आणि ठाण्यात सत्ता वाकडी सरकली आहे, म्हणून हा सगळा प्रकार सुरू आहे.” त्यांनी भाजप आणि अजित पवार गटावरही टीका करत “सगळे गुंड त्यांच्याकडे आहेत,” असा आरोप केला.
दरम्यान, शिवसेना भवनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आनंदाची गोष्ट म्हणजे ४ तारखेला राज ठाकरे शिवसेना भवनात येणार आहेत. शिवसेना भवनसारखी प्रेरणादायी जागा दुसरी कुठे आहे का? शिवसेना भवन जिथे आहे, तिथेच मनसेचा उमेदवार आहे. ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “मराठीत बोला ना. महाराष्ट्रात कारभार मराठीतच व्हायला हवा.” मुंबईच्या महापौरपदावरूनही त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले, “मुंबईत मराठी महापौरच होणार. भाजप म्हणते हिंदू महापौर होणार, पण आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. ही मुंबई मराठी आहे आणि आमच्या नसानसांत हिंदुत्व आहे.” संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, येत्या काळात या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.