पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. तिथे फ्रंटियर कोरचं मुख्यालय आहे. पॅरा मिलिट्री फोर्सेजच मुख्य कार्यालय आहे. आज सोमवारी सकाळी पाकिस्तान निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. फ्रंटियर कोरच्या मुख्यालयात दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सुरक्षापथकांनी हल्ला झालेल्या परिसराला घेराव घालून ऑपरेशन सुरु केलं आहे. फ्रंटियर कोर मुख्यालय परिसरात दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटात उडवून दिलं. सूत्रांनी रॉयटरला ही माहिती दिली आहे. यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या आत्मघातकी हल्लेखोराने फ्रंटियर कोरच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्फोट घडवून आणला. दुसऱ्याने आतमध्ये जाऊन स्वत:ला स्फोटात उडवलं. वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर रॉयटर्सला ही माहिती दिली.
कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या लष्कराने आणि पोलिसांनी फ्रंटियर कोरचं मुख्यालय परिसराला घेराव घातला आहे. आतमध्ये दहशतवादी घुसले असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानी लष्करी कॅनटॉनमेंट जवळ हे मुख्यालय आहे. हा सर्व वर्दळीचा भाग आहे. ‘वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. लष्कर आणि पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे’ असं या भागातील रहिवाशी सफदर खानने सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाचे पोलीस महासंचालक (आयजी) जुल्फिकार हमीद यांनी पाकिस्तानी मीडियाशी बोलताना सांगितलं की, दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. एक स्फोट मेन गेटवर झाला. दुसरा स्फोट मुख्यालय परिसरात मोटरसायकल स्टँड जवळ झाला. मोटरसायकल स्टँड निमलष्करी दलाच्या मुख्यालय परिसरात आहे. पेशावरच्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतय, एक स्फोट मेन गेट बाहेर झाला. आगीच्या ज्वाळा तिथे दिसतात. त्यानंतर एक व्यक्ती मुख्य गेटमधून आतमध्ये जाताना दिसतो.
याआधी सुद्धा हल्ले
याआधी सुद्धा निमलष्करी दलाच्या मुख्यालयाबाहेर हल्ला झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला क्वेटा येथे निमलष्करी दलाच्या कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात कमीत कमी 10 लोक मारले गेलेले. अनेक जण जखमी झालेले. पाकिस्तानात सध्या तणाव मोठ्या प्रमाणात आहे. 3 सप्टेंबर रोजी क्वेटा येथे एका राजकीय रॅलीमध्ये आत्मघातकी हल्ला झाला. यात 11 लोक मारले गेले. 40 पेक्षा जास्त जखमी झाले. स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रात हा हल्ला झालेला. शेकडो बलोचिस्तान नॅशनल पार्टीचे समर्थक जमलेले असताना हा हल्ला झालेला.
बलूच बंडखोर दीर्घकाळापासून लढतायत
पाकिस्तानात बलूच बंडखोर दीर्घकाळापासून आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. मार्च महिन्यात बलोच लिबरेशन आर्मीने एका ट्रेनच अपहरण केलं व सैनिकांची हत्या केली. जानेवारी पासून आतापर्यंत विभिन्न हल्ल्यात 430 पेक्षा जास्त लोक मारले गेलेत. यात बहुतांश सुरक्षा कर्मचारी आहेत.