मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील शब्दयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले होते. त्या आव्हानाला आता फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले. “मी मुंबई महापालिका वगळता दुसऱ्या कोणत्याही महापालिकेच्या सभेतील माझी भाषणे काढून पाहा. मी मुंबईत फक्त विकासावरच बोलतो. माझ्या भाषणांपैकी ९० टक्के विकासावर असतात आणि केवळ १० टक्के उत्तरं देण्यासाठी असतात. माझी निवडक चार भाषणे काढा, ती उद्धव ठाकरेंना द्या आणि माझे एक लाख रुपये घेऊन या,” अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले.
याआधी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका करत म्हटले होते की, “देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने कधीही हिंदू-मुस्लिम न करता भाषण केले असेल, तर ते दाखवा. अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी त्यांनी तेच केलं आहे. असे एक भाषण दाखवल्यास आम्ही सर्वजण त्यांना एक लाख रुपये देऊ.” या आव्हानाला उत्तर देताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उलट सवाल केला. “मी उद्धव ठाकरेंना आधीच आव्हान दिलं होतं की त्यांनी विकासावरचं एक तरी भाषण दाखवावं आणि माझ्याकडून एक हजार रुपये घ्यावेत. ते आजपर्यंत ते करू शकले नाहीत. आता मी सात हजार रुपयांचं आव्हान देतो, उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा आणि सात हजार रुपये घेऊन जा,” असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, कोस्टल रोडच्या श्रेयवादावरही फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. “कोस्टल रोड ही संकल्पना जुनी आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं होतं. मात्र केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार असतानाही हा प्रकल्प पुढे सरकला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली,” असे फडणवीस म्हणाले. कोस्टल रोडसाठी परवानग्या मिळवणे हेच सर्वात मोठे आव्हान होते, असे सांगत फडणवीस म्हणाले की, पर्यावरणाशी संबंधित नियमांमुळे हा प्रकल्प अडलेला होता. दोन वर्षांत अनेक बैठकांनंतर अखेर मंजुरी मिळाली. “कोस्टल रोडमुळे २५० एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी रिअल इस्टेट होणार नाही, मैदाने आणि प्रोमेनाड तयार केले जातील, असा मी लेखी अॅफिडेविट दिल्यानंतरच मंजुरी मिळाली,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सर्व कायदेशीर लढाया जिंकून प्रकल्प पूर्ण केला गेला. “उद्धव ठाकरे कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांनी भूमीपूजन केलं. मला श्रेयाच्या लढाईत पडायचं नव्हतं. त्यांनी भूमीपूजन केलं, आणि आम्ही कोस्टल रोडचा पहिला, दुसरा आणि शेवटचा टप्पा उद्घाटित केला. त्यामुळे त्यांनी घेतलेलं श्रेय केवळ प्रेझेंटेशन आणि भूमीपूजनापुरतंच आहे,” असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.