दरवर्षी श्रावण सुरू होण्याच्या आधी आपल्या मित्रपरिवारासोबत गटारी पार्टी करणं हे अनेकांसाठी आनंदाचा, धमाल-मस्तीचा आणि 'नॉनव्हेज'चा पर्वणीसारखा क्षण असतो. पण कधी तुम्ही थांबून विचार केलात का — ही 'गटारी' म्हणजे नक्की काय आहे? हा शब्द कुठून आला? आणि का साजरी केली जाते ही 'गटारी अमावस्या'? चला आज आपण गटारी अमावस्येबद्दल जाणून घेऊया.
दीप अमावस्येचा शुभ प्रकाश
श्रावण म्हणजेच सात्त्विकतेचा, संयमाचा आणि भक्तीचा महिना. मात्र त्याचा सुरुवात होण्यापूर्वीचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या हिंदू संस्कृतीत 'दीप अमावस्या' म्हणून ओळखली जाते. या दिवशी घराघरांतील जुने दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा म्हणजे तेज, दिवा म्हणजे ज्ञान, आणि दिवा म्हणजे अंधारावर विजय. या दिवशी लहान मुलांचे औक्षण करण्याचीही परंपरा आहे — कारण ते आपल्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असतात. पण या दीप अमावस्येला अजून एक नाव आहे — 'गटारी अमावस्या'. आणि हे नाव, ऐकताना जरी आधुनिक वाटलं तरी, त्यामागे आहे एक प्राचीन परंपरा आणि भाषाशास्त्रीय प्रवास.
'गटारी'चा अर्थ काय?
'गटारी' हा शब्द अनेकांना थेट दारू, मटण आणि पार्टीशी संबंधित वाटतो. पण खरेतर तो शब्द अपभ्रंशातून तयार झालेला आहे. मूळ शब्द होता 'गतहारी'. 'गत' म्हणजे मागे गेलेला. 'हारी' म्हणजे आहारी जाणे. म्हणजेच, 'गतहारी' म्हणजे मागे सोडलेले आहार. याचा अर्थ असा की, जे पदार्थ आपण काही काळासाठी वर्ज्य करणार आहोत — ते आधी मनमुराद खाऊन घेण्याचा दिवस म्हणजे 'गतहारी अमावस्या'. हाच शब्द बोली भाषेत 'गटारी' झाला — आणि पुढे पार्टींचा एक 'ट्रेंडी' सण ठरला!
चार्तुमासाची पार्श्वभूमी
आषाढ अमावस्येनंतर सुरू होतो — चार्तुमास. म्हणजेच पावसाळ्याच्या चार महिन्यांचा आध्यात्मिक, धार्मिक आणि आहारशुद्धीचा कालावधी. या काळात अनेकांनी मांसाहार, कांदा-लसूण, मद्यपान यांपासून संयम बाळगण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक कारणांइतकेच वैज्ञानिक कारणंही आहेत:
1. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारी बंद असते.
2. भाज्या, कंदमुळे आणि धान्य यांचा पुरवठा या काळात कमी असतो. 3. पावसामुळे पचनसंस्थेवर ताण येतो — त्यामुळे जड पदार्थ टाळले जातात.
म्हणून चार्तुमासात आहार नियंत्रित ठेवावा लागतो. पण त्याआधी “एक शेवटचा ताव” घ्यावा, या उद्देशाने 'गतहारी अमावस्या' साजरी केली जाते!
गटारी स्पेशल: जेवण आणि जिव्हाळा
गटारी अमावस्येचा अर्थ फक्त मांसाहारावर ताव मारणे इतकाच नसतो — तर तो असतो मैत्रीचा, हास्याचा आणि अनौपचारिक गेट-टुगेदरचा क्षण! या दिवशी घराघरांतून सुकं मटण, तांबडा पांढरा रस्सा, कोळंबी, सुरमई, बोंबील, बाफत, तंदुरी चिकन अशा भुरळ घालणाऱ्या डिशेसचा सुगंध दरवळतो. कधी नात्यांचा गोडवा वाढवणारी, कधी आठवणींना उजाळा देणारी आणि कधी फक्त “पोटभर खाणं” हेच सुख मानणारी गटारी पार्टी ही आपल्यासाठी उत्सवाचं रुपांतर एका साध्या क्षणात करते.
संस्कृतीचा गंध: आधुनिकतेतून परंपरेचा आदर
आज जरी 'गटारी' हा शब्द वाइन ग्लास आणि इंस्टाग्राम स्टोरींशी जोडला जात असला तरी त्यामागची पारंपरिक मुळे अजूनही खोलवर रुजलेली आहेत. आपल्या संस्कृतीने 'संयमाचा आरंभ' साजरा करण्यासाठी 'मुक्तता'चे एक पर्व ठेवलं आहे आणि त्यालाच 'गटारी' म्हणतात. गटारी अमावस्या ही आपल्याला स्मरण करून देते की, बदल स्वीकारताना आपल्या मुळांशी नातं टिकवणं किती गरजेचं आहे.