थोडक्यात
आधार कार्डबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय
आधारकार्ड अपडेट करण्याची फी वाढली
लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट्स फ्री
आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणत्याही सरकारी किंवा बँकिंग कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. अशातच आता आधार कार्डबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधारशी संबंधित महत्त्वाचे बदल केले आहेत. याचा परिणाम देशातील सर्व नागरिकांवर होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आधारकार्ड अपडेट करण्याची फी वाढली
UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची फी वाढवली आहे. आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी पूर्वी 50 रूपये द्यावे लागत होते, मात्र आता या कामांसाठी 75 रूपये द्यावे लागणार आहेत. याआधी बायोमेट्रिक अपडेट्स म्हणजेच फिंगरप्रिंट, आयरिस किंवा फोटो बदलण्यासाठी 100 रूपये द्यावे लागत होते, मात्र आता 125 रूपये मोजावे लागणार आहेत. तांत्रिक खर्च वाढल्यामुळे फी वाढवण्यात आल्याची माहिती UIDAI कडून देण्यात आली आहे.
UIDAI ने जुलै 2025 मध्ये आधार अपडेट आणि नवीन आधार कार्डसाठी कागदपत्रांची नवीन यादी जारी केली. यानुसार सर्व भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय, OCI कार्डधारक आणि हिंदू अविभाजित कुटुंबे (HUF) यांच्यासाठी एकसमान आणि स्पष्ट नियम जारी करण्यात आले आहेत. UIDAI ने हेही सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच आधार क्रमांक असू शकतो. जर एखाद्याकडे दोन आधार नंबर असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
मोफत अपडेटचा कालावधी संपला
UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 ची अंतिम मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत संपली आहे. आता कोणत्याही प्रकारचे अपडेट करायचे असेल तर त्यासाठी फी भरावी लागणार आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की मोफत अपडेट सुविधा भविष्यात पुन्हा सुरू होऊ शकते, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट्स फ्री
UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याचे शुल्क वाढवले असले तरी लहान मुलांना दिलासा दिला आहे. 7 ते 15 वयोगटातील मुलांसाठी फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन अपडेट्स मोफत केले जाणार आहेत. पूर्वी यासाठी शुल्क आकारले जात असे, मात्र आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मुलांचे चेहरे आणि बोटांचे ठसे वय वाढल्यानंतर बदलत असतात, त्यामुळे हे अपडेट मोफत करण्यात आले आहे.