बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा हा सण. हा सण विशेषतःग्रामीण भागात भव्य पातळीवर साजरा केला जातो, ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. बैल पोळा हा सण बैलाच्या सन्मानाचा उत्सव आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड मधील शेतकरी साजरा करतात. या सणाला काही ठिकाणी बेंदूर सुद्धा म्हटले जाते. हा उत्सव मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये मुख्यतः साजरा केला जातो. तर आपण आज बैल पोळा कशाप्रकारे साजरा केला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
बैल पोळा का साजरा केला जातो? : बैल शेतीच्या कामात खूप राबतात, बैल म्हणजे शेतकऱ्याचा मित्रच. आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवजड कामे जसे की नांगरणी, वाहतूक बैलांच्या साह्यायानेच केली जात असे.पूर्वीच्या काळी मोटरगाड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. अगदी नव्या लग्न झालेल्या जोडप्याची वरात सुद्धा बैलगाडीतून जात असे. या काळात बैल हा शेतकऱ्याच्या आयुष्याशी खूप जोडून होता. बैलांच्या या मदतीसाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी बैल पोळा सण साजरा केला जातो.
बैल पोळा कशा प्रकारे साजरा करतात? :
● पोळा हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात.
● त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.
● या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.
● या सणादिवशी गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस ऋणी होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे पहिले जाते.