थोडक्यात
दिवाळी नाही… काली पूजा
भय, अंधार आणि अज्ञानाचा अंत
काली उपासनेचा इतिहास
दिवाळीच्या रात्री जेव्हा संपूर्ण भारतातील घरे, मंदिरे आणि रस्ते दीपमाळांनी उजळून निघतात. तेव्हा पूर्व भारतात मात्र या महापर्वाचं वेगळंच स्वरूप दिसून येतं. देशभर जिथं देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिथं पश्चिम बंगाल, बिहार, असम आणि ओडिशा या राज्यांमध्ये माता महाकालीची आराधना केली जाते. या पूजेला महानिशा पूजा म्हटलं जातं. तंत्र परंपरेशी निगडित अशी ही रात्र भय आणि अंधाराच्या नाशाचं तसेच आत्ममुक्तीचं प्रतीक मानली जाते.
दिवाळी नाही… काली पूजा
महाकाली देवीला त्यांच्या ‘घोर काल’ स्वरूपामुळे (Diwali 2025) निशामग्नी असंही म्हटलं जातं, आणि त्याचं संक्षिप्त रूप म्हणजे महानिशा. प्रत्यक्षात दिवाळीची अमावस्येची ही रात्र म्हणजे महाकालीचंच स्वरूप — जिथं प्रकाश आणि अंधार यांचा संयोग होतो. पूर्व भारतात मानलं जातं की, महालक्ष्मी ही महाकालीचं सात्विक रूप आहे. काली ही शक्तीचा उग्र अविष्कार असून, लक्ष्मी ही त्याच शक्तीची कोमल ( Kali Puja) आणि ऐश्वर्यदायिनी रूप आहे. त्यामुळे दिवाळीच्या (Diwali) रात्री शाक्त परंपरेचे अनुयायी माता कालीची पूजा करून त्या शक्तीचं आवाहन करतात.
भय, अंधार आणि अज्ञानाचा अंत
उत्तर भारतात जिथं दिवाळीला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, तिथं बंगालमध्ये ती आत्मजागृती आणि अंधाराच्या अंताची साधना असते. या रात्रीचा अर्थ फक्त बाह्य दीपप्रकाश नाही — तर आत्म्याचा दीप प्रज्वलित करण्याची प्रक्रिया आहे. महानिशा पूजेचं सार असं की, खरा प्रकाश तेव्हाच अर्थपूर्ण ठरतो जेव्हा आपण आपल्या आतल्या अंधाराला ओळखून त्यावर विजय मिळवतो.
काली उपासनेचा इतिहास
काली उपासनेचा उल्लेख अनेकसंस्कृत ग्रंथांमध्ये आढळतो. परंतु तिचा लोकजीवनातील लोकप्रिय अविष्कार मध्ययुगात दिसून आला. सतराव्या शतकातील ‘कालिकामंगलकाव्य’ या ग्रंथात पहिल्यांदा काली पूजेच्या सविस्तर विधीविधानांचा उल्लेख सापडतो. नदियाचे राजा कृष्णचंद्र यांनी या पूजेला सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर प्रतिष्ठा दिली. पुढे अठराव्या-एकोणिसाव्या शतकात ही परंपरा श्रीरामकृष्ण परमहंस आणि बामाखेपा यांसारख्या संतांच्या साधनेशी जोडली गेली.
महानिशा पूजेचा विधी
कार्तिक अमावस्येच्या रात्री तांत्रिक साधक देवी कालीची साधना करतात. घरांमध्ये व पंडालांमध्ये मातीच्या मूर्ती स्थापल्या जातात. देवीला लाल वस्त्र, गुडहळाची फुलं, मिठाई, फळं आणि भात-दाळ अर्पण केली जाते. देवीचा लाल रंग रक्ताचं नव्हे, तर शक्तीचं आणि जीवनऊर्जेचं प्रतीक आहे. तांत्रिक साधक संपूर्ण रात्र ध्यान, जप आणि साधनेत व्यतीत करतात — कारण असं मानलं जातं की या निशीथ काळात देवी स्वतः प्रकट होऊन साधकांना भयमुक्त करते.
ब्राह्मण परंपरेनुसार मात्र ही पूजा शांत भक्तीने केली जाते, ज्यात कोणतीही बलिदान पद्धत नसते.
बंगालची काली पूजा
पश्चिम बंगालमध्ये काली पूजा ही केवळ धार्मिक घटना नसून एक सांस्कृतिक उत्सव आहे.कोलकाता, बारासात, सिलीगुडी, कूचबिहार आदी ठिकाणी हजारो पंडालांमध्ये कलात्मक मूर्ती उभारल्या जातात. रात्रभर संगीत, नाट्यप्रयोग आणि आतषबाजीने शहर उजळून निघतं. कालीघाट मंदिरात या दिवशी देवीची पूजा लक्ष्मी स्वरूपात केली जाते, तर दक्षिणेश्वरमध्ये देवीच्या रौद्र आणि करुण दोन्ही रूपांची आराधना केली जाते. बिहारच्या भागलपूर परिसरातही ही पूजा लोकउत्सवाच्या स्वरूपात साजरी होते.
प्रकाश आणि अंधार
पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी प्रथमच देवीला महानिशा कालात जागृत केलं होतं, म्हणून ही पूजा रात्रीच्या अंधारात केली जाते. अयोध्येत श्रीरामांच्या आगमनानिमित्त दिवे पेटवले गेले, त्या रात्री बंगालमध्ये साधकांनी कालीचं आवाहन केलं — हाच दिवाळीचा सांस्कृतिक द्वैतभाव आहे. एकीकडे लक्ष्मी समृद्धीचं प्रतीक आहे, तर दुसरीकडे काली ही शक्ती आणि आत्मबोधाचं प्रतीक. दोन्ही एकत्र भारतीय तत्त्वज्ञानाचा गूढ संदेश देतात — “प्रकाश तेव्हाच पवित्र असतो, जेव्हा तो अंधाराला स्वीकारून ज्ञानात रूपांतरित करतो.”
भीतीतून मुक्ततेकडे प्रवास
काली पूजेच्या रात्री साधक आपल्यातील भीती, वासना आणि अज्ञानाचा अंत करून आत्ममुक्तीचा संकल्प करतात. देवीचा रक्तवर्ण रूप — बाहेर आलेली जीभ, हातात खड्ग आणि असुराचं शिर — हे हिंसेचं नव्हे, तर अहंकाराच्या अंताचं प्रतीक आहे. काही ठिकाणी पूर्वी प्रचलित पशुबलिदानाची जागा आता प्रतीकात्मक ‘कद्दू बलिदान’ घेत आहे.
काली पूजा हा बंगालचा सर्वात मोठा उत्सव
दुर्गा पूजनानंतर काली पूजा हा बंगालचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. ढाकच्या आवाजात, शंखनादात, स्त्रियांच्या लाल पारंपरिक साड्यांमधील सिंदूर खेळात आणि पुरुषांच्या आरतीतील समर्पणात एक सामुदायिक एकात्मता दिसते. हीच ती रात्र जिथं भय आणि भक्ति, कला आणि अध्यात्म, परंपरा आणि आधुनिकता — सगळं एकत्र मिसळून जाते.
काली पूजा म्हणजेच विनाशातून सृजनाचा आणि अंधारातून प्रकाशाचा प्रवास.