कष्ट, चिकाटी आणि शिक्षणावरची अढळ श्रद्धा असेल, तर कोणतीही पार्श्वभूमी यशाच्या आड येत नाही, याचा जिवंत प्रत्यय डॉ. गौरी अनुरथ झोळ यांच्या यशकथेतून येतो. वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) या ग्रामीण भागातून येत, वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या एम.डी. डर्मेटोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांनी मिळवलेले यश हे केवळ वैयक्तिक नाही, तर शेतकरी कुटुंबाच्या संघर्ष, त्याग आणि स्वप्नांची पूर्तता करणारे आहे.
डॉ. गौरी झोळ यांचा हा प्रवास मातीशी नातं जपणाऱ्या घरातून सुरू झाला. लहानपणापासूनच कष्ट, शिस्त आणि संयम या मूल्यांमध्ये वाढलेल्या गौरी यांनी अभ्यासाला आयुष्याचा केंद्रबिंदू मानले. साधी, शिस्तबद्ध जीवनशैली, वेळेचं काटेकोर नियोजन आणि पुस्तकांशी जुळलेली मैत्री यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. अभ्यासासोबतच समाजाविषयीची जाणीव आणि माणुसकीची जबाबदारी त्यांच्या मनात दृढ होत गेली.
त्यांचे शालेय शिक्षण शारदानगर, बारामती येथे झाले. पुढे सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथून त्यांनी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, मुंबई येथून एम.बी.बी.एस. पदवी घेत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला. या संपूर्ण प्रवासात त्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्यावर भर न देता, समाजासाठी उपयुक्त ठरणारा संवेदनशील डॉक्टर होण्याचा ध्यास कायम ठेवला.
या यशामागे त्यांचे वडील अनुरथ झोळ आणि आई लक्ष्मी झोळ यांचा मोठा वाटा आहे. शेतकरी कुटुंबातील मर्यादित साधनसंपत्ती असूनही, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सर्वस्व दिले. प्रत्येक अडचणीत पाठीशी उभे राहून त्यांनी गौरीच्या स्वप्नांना बळ दिले. त्यामुळेच गौरी झोळ या केवळ एक डॉक्टर नसून, पालकांच्या संघर्षाची जिवंत साक्ष ठरतात.
अनुरथ झोळ यांची दुसरी मुलगी मानसी झोळ हिने बी.बी.ए. इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कुटुंबातील शैक्षणिक वाटचाल अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. गौरी झोळ म्हणाल्या, “आज मी एम.डी.पर्यंत पोहोचले आहे, पण हे यश माझे एकटीचे नाही. हे माझ्या आई-वडिलांचे आहे. वडिलांनी स्वप्नांना बळ दिलं, तर आईने घर सांभाळत मला अभ्यासासाठी आधार दिला. आज डॉक्टर म्हणून समाजाप्रती माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. ग्रामीण आणि गरजू रुग्णांसाठी काम करणं हेच माझं खरं ध्येय आहे.”
डॉ. गौरी अनुरथ झोळ यांच्या या यशामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे. त्यांची ही वाटचाल असंख्य विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी, आशेचा दीप ठरत आहे.