उदय चक्रधर । कोरोना महामारीत शाळा सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी नसताना देखील गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या मौखिक सुचनेवरून गावात एका रूममध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याचे वृत्त लोकशाही न्यूजने प्रसिद्ध केले होते. तसेच या शिकवणीमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब लोकशाही न्यूजने समोर आणली होती. या वृत्तानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांची बदली करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाने एक पत्र काढून जिल्ह्यातील सर्व शाळांना गावातील चावडी,समाजमंदिर,रिकाम्या घरांमध्ये विद्यार्थ्यांना गोळा करून शाळा भरविण्याचे फर्मान सोडले होते.त्यामुळे शिक्षकांनी शाळा भरवायला सुरुवात केली होती.मात्र या शाळेत ना सँनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. त्यामुळे 1 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसह त्यांना शिकवणारे शिक्षक ठरणार कोरोना पसरविणारा कोरोना बॉम्ब या मथळ्याखाली लोकशाही न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणार कोण? असा सवालचं उपस्थित केला होता.
लोकशाही न्युजच्या या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांची बदली करण्यात आली आहे. राजकुमार हिवारे यांची आता चंद्रपूरला बदली करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मोठा धक्का बसला आहे.