भूगोल... शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय, मात्र तेवढाच उत्साहवर्धक विषय. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी, त्याचे महत्व लोकांना समजावे, या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे 'राष्ट्रीय भूगोल दिन'. मकर संक्रातीला अर्थात 14 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. सूर्याचे उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात भ्रमण सुरु होते म्हणून भारतीय पंचागात संक्रातीला अतिशय महत्त्व आहे.
भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित आहेत. मकर संक्रांत हा सण तर त्याचेच एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. भूगोलाच्या विविध शाखा आहेत. जसे राजकीय भूगोल, वस्ती भूगोल, हवामानशास्त्र, आर्थिक भूगोल, लष्करी भूगोल वगैर आहेत. मात्र शालेय अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो. त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो आणि भूगोलाशी असणारा संपर्क तुटतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती लष्करी भूगोलावर आधारीत होती. आपले राजस्थानी आणि गुजराती बांधव पिढीजात व्यवसाय करू शकतात. याची कारणे तेथील भौगोलिक परिस्थीतीशी परिणाम साधणारी आहेत. आपल्याकडे हिवाळ्यात उत्तर गोलार्धातून स्थलांतरीत पक्षी येतात. याचे कारणसुद्धा भूगोलाशी संबंधित आहे. सध्या आपण अत्यंत विषम परिस्थीती अनुभवत आहोत. याचासुध्दा अभ्यास भूगोलात करण्यात येतो. सध्या रस्त्याने जाताना आपणास ठिकठिकाणी रस्त्याची मोजणी करताना दिसतात. तो सुद्धा भुगोलाचा भाग असतो.