भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकताच झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे (FTA) भारतीय ग्राहकांसाठी लक्झरी कार खरेदी करणे अधिक सुलभ आणि परवडणारे होणार आहे. या करारामुळे ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या लक्झरी कारवरील आयात शुल्क 100 टक्क्यांवरून थेट 10 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले आहे.
यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या लक्झरी कारची मूळ किंमत 2 कोटी रुपये असेल, तर पूर्वी ती भारतात 4 कोटीपर्यंत पोहोचत असे. मात्र, आयात शुल्क कमी झाल्यामुळे आता तीच कार सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांमध्ये मिळू शकते. परिणामी ग्राहकांचे जवळपास 80 ते 90 लाख रुपये वाचणार आहेत.
या निर्णयामुळे Rolls Royce, Bentley, Jaguar Land Rover, Aston Martin, Lotus, McLaren यांसारख्या प्रतिष्ठित कार ब्रँड्सची भारतातील विक्री वाढण्याची शक्यता आहे. तसंच, ट्रायम्फ, नॉर्टन, बीएसए यांसारख्या प्रसिद्ध दुचाकी ब्रँड्सदेखील आता भारतीय बाजारात तुलनेत स्वस्त दरात उपलब्ध होतील.
हा करार फक्त ब्रिटिश कार उत्पादकांसाठीच फायद्याचा ठरणार नाही, तर भारतीय कंपन्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांना ब्रिटनच्या वाहन बाजारात प्रवेश मिळणार असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या मानांकनामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना तिकडे चांगली मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कंप्लीट बिल्ट युनिट (CBU) स्वरूपात आयात होणाऱ्या वाहनांवरील कर कपात ही मर्यादित संख्येपुरती असणार आहे, मात्र तरीही भारतीय ग्राहकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. लक्झरी कार्सच्या किमती कमी झाल्यामुळे देशात त्यांचा वापर वाढेल आणि वाहन उद्योगाला नवसंजीवनी मिळेल.