महाकुंभमेळ्यात व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटात भूमिका ऑफर करणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर बलात्काराचा आरोप असल्याची महिती मिळत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सनोज मिश्राचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दिग्दर्शक सनोज मिश्राने एका छोट्या शहरातील एका मुलीवर, जी नायिका बनू इच्छित होती, तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी नबी करीम पोलिस स्टेशनच्या पथकाच्या मदतीने गाझियाबाद येथून सनोज मिश्रा यांना अटक केली होती.
मिळलेल्या माहितीनुसार, पीडितेची आणि आरोपीची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली. पीडित मुलगी झाशी येथे राहत असल्याचे समजले आहे. दोघांमध्ये सोशलमीडियाद्वारे बोलणं सुरु झाले होते. त्यानंतर आरोपी दिग्दर्शकाने पीडितेला फोन करून सांगितले की, तो झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचला आहे. त्यावेळेस पीडितेने सामाजिक दबावामुळे त्याला भेटण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. या भीतीमुळे पीडित मुलगी त्याला भेटायला गेली. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी आरोपीला भेटण्यास गेली. तेव्हा आरोपी तिला झाशीहून एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला. पीडितेला नशा देणारे पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर एफआयआरमध्ये पीडितेने म्हटले आहे की, आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. तो बोलेल ते नाही केल्यास तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली होती. यानंतर त्याने तिला लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यासोबतच त्याने तिला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष देखील दाखवले होते. या आशेने पीडिता मुंबईत आली आणि आरोपीसोबत राहू लागली. पण तिथेही आरोपी तिचे शोषण करत राहिला आणि तिला अनेक वेळा मारहाणही करत राहिला. पीडितेचा आरोप आहे की, आरोपीने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. फेब्रुवारी २०२५ मध्ये, आरोपीने तिला सोडून दिले आणि धमकी दिली की जर तिने काही तक्रार केली तर तो तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.