मौनी अमावस्येच्या पवित्र दिनी गंगा घाटावर स्नान करण्यासाठी भाविकांचा प्रचंड मोठा जनसमुदाय उसळला होता. यावेळी ३० भाविकांचा महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. या परिसरातील बॅरिकेट्स हटल्याने भाविक एकमेकांवर पडले आणि एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीत ९० हून अधिक भाविक जखमीही झाले आहेत.
महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. या घटनेवरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळाले. महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन खासदार जया बच्चन यांनी खळबळजनक दावा केला आहे ज्यामुळे राजकारण तापलं आहे. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्याचा खळबळजनक दावा समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी केला आहे.
जया बच्चन म्हणाल्या की, या घटनेनंतर महाकुंभात जल प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, परंतु सरकार यावर कोणतेही ठोस उत्तर देत नाही. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याने पाणी प्रदूषित झाले, परंतु सरकार या मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.