भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत एक नवीन क्रांती होत आहे. JSW MG Motor India ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार एमजी विंडसरचा नवीन अवतार MG Windsor EV Pro भारतीय बाजारात लाँच केली आहे. या कारमध्ये देण्यात आलेल्या व्हेईकल-टू-लोड (Vehicle-to-Load - V2L) तंत्रज्ञानामुळे आता ही कार चालतं-फिरतं किचन बनली आहे.
V2L तंत्रज्ञानामुळे वापरकर्ते कारच्या बॅटरीमधून थेट वीज मिळवून विविध इलेक्ट्रॉनिक डिव्हायस चालवू शकतात. हे तंत्रज्ञान इतकं प्रभावी आहे की त्याच्या मदतीने तुम्ही इंडक्शन कुकर, मायक्रोवेव्ह, कॉफी मशीन, एलईडी लाईट्स, लॅपटॉप्स, मोबाईल्स अशा अनेक उपकरणांना कुठेही आणि कधीही वीजपुरवठा करू शकता. इतकेच नाही तर ही कार दुसऱ्या इलेक्ट्रिक वाहनालाही चार्ज करू शकते.
MG Windsor EV Pro मध्ये 52.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून यामुळे गाडीची रेंज आणि कार्यक्षमता वाढली आहे. तसेच यामध्ये लेव्हल-2 ADAS (Advanced Driver Assistance System) सारखे सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. गाडीला हेक्टर प्रमाणे अॅलॉय व्हील्स आणि इलेक्ट्रिक टेलगेट देण्यात आले आहे, ज्यामुळे तिचा लुक अधिक आकर्षक बनतो.
या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. “बॅटरी एज अ सर्व्हिस” पर्याय घेतल्यास ही किंमत 12.49 लाख रुपये इतकी होते. ही ऑफर पहिल्या 8000 ग्राहकांसाठी होती आणि केवळ 24 तासांत ही बुकिंग पूर्ण झाली आहे. सध्या या कारच्या किमतीत सुमारे 60 हजार रुपयांची वाढ झालेली आहे.
V2L तंत्रज्ञानामुळे ही कार केवळ वाहन म्हणून न राहता, ट्रॅव्हलिंग, कॅम्पिंग आणि ऑफ-ग्रिड वापरासाठी एक पॉवर स्टेशन ठरते. ही टेक्नोलॉजी भविष्याच्या मोबिलिटीसाठी मैलाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.