गटारी पार्टी म्हणजे धमाल, मस्ती आणि भन्नाट खाणं! आषाढी अमावास्येच्या निमित्ताने येणारी ही खास संध्याकाळ नॉनव्हेजप्रेमींसाठी पर्वणी ठरते. आणि यंदा तर रविवारीच गटारी आल्यामुळे हप्ता संपवून अगदी हक्काने, आरामात पार्टी करता येणार! जेवणाच्या बेतात थोडा झणझणीतपणा आणि झटपट तयारी हवीच ना? म्हणूनच खास तुमच्यासाठी घेऊन आलोय भन्नाट गटारी स्पेशल मेन्यू – तयार करा, ताव मारा, पार्टी एन्जॉय करा!
स्वच्छ धुतलेल्या अर्धा किलो चिकनचे छोटे तुकडे लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करून ठेवा. मग त्यात टाका मिरची पावडर, धणे पावडर, हळद, आलं-लसूण पेस्ट आणि चण्याचं पीठ – सगळं व्यवस्थित लावून ते चिकन डीप फ्राय करा. शेवटी चाट मसाला, लिंबाचा शिंतोडा आणि मग – गरमागरम सोलो किंवा फुल पाटील पार्टीत सर्व्ह करा!
तुमच्या आवडीनुसार कुठलाही मासा घ्या – बोंबील, सुरमई, रावस किंवा मांडळी. त्यावर आलं-लसूण पेस्ट, तिखट, हळद, ओवा, लिंबूरस, मीठ लावून तासभर मॅरीनेट करा. मग तुकडे रवा किंवा तांदळाच्या पिठात घोळवा आणि खरपूस शेलो फ्राय करा. हिरव्या चटणीसोबत प्लेटवर मांडला की पार्टीची शान वाढणार, एवढं नक्की!
तीन-चार उकडलेली अंडी किसून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, गरम मसाला, तिखट, चन्याचं पीठ, काळी मिरी आणि मीठ घालून मिक्स करा. थोडं पाणी घालून मिश्रण मळा आणि कबाबचे छोटे छोटे गोळे बनवा. हे ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा आणि डीप फ्राय करा. बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट! हिरवी चटणी हवीच हवी याच्यासोबत.
शेंगदाणे धुऊन आलं-लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, मिरची पावडर, मीठ, बेकिंग सोडा आणि चाट मसाल्याने माखा. बेसनात चांगलं घोळवून गरम तेलात हळूहळू सोडा. कुरकुरीतपणा येईपर्यंत तळा. टिश्यू पेपरवर काढा आणि वरून अजून थोडा चाट मसाला टाका. पाहुण्यांच्या हातातून संपायला वेळ लागणार नाही!