Parag Shah is richest candidate in maharashtra vidhansabha 
Candidates Profile

घाटकोपर पूर्वचा बालेकिल्ला भाजप यंदाही राखणार? भाजपकडून पराग शहा रिंगणात

घाटकोपर पूर्व या भाजपच्या बालेकिल्ल्यातून पराग शहा रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचे नाव : पराग शाह

मतदारसंघ : घाटकोपर पूर्व

पक्षाचे नाव - भाजप

समोर कोणाचं आव्हान - राखी जाधव( राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार)

घाटकोपर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच यंदाही भाजप व महायुतीचे उमेदवार पराग शहा तो राखण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह राज्यात भाजप व महायुतीला फटका बसला असला तरी घाटकोपर या बालेकिल्ल्यात भाजपला आघाडी मिळाली. या मतदारसंघात मध्यमवर्गीयांचे प्रमाण मोठे असून गुजरातीभाषिक साधारणपणे ३५ टक्के, मराठी, उत्तर भारतीय व अन्य भाषिकांचे प्रमाण ४० टक्के आहे.

पंतनगर, गरोडिया नगर, कामराजनगर, राजावाडी परिसर आदी भाग या मतदारसंघात येतो. या मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतदार असून २०१९ च्या निवडणुकीत पराग शहा यांना ७३,०५४ मते मिळाली होती. मनसेचे सतीश पवार हे १९,७३५ मते मिळवून दुसऱ्या स्थानावर होते. शहा यांनी तब्बल ५३ हजार ३१९ मतांनी पवार यांचा पराभव केला होता.

काँग्रेसच्या मनीषा सूर्यवंशी या १५,७५३ मते मिळवून तिसऱ्या स्थानी होत्या. त्यावेळी माजी मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारून पराग शहा यांना देण्यात आली होती. यंदाही शहा यांना उमेदवारी देण्यात आल्याने मेहता हे नाराज होते. कोणत्याही परिस्थितीत यंदा निवडणूक लढविण्याचा चंग मेहता यांनी बांधला होता व प्रचाराचे कामही सुरु केले होते. भाजपने उमेदवारी न दिल्यास ते शिवसेनेत (उद्धव ठाकरे) जाऊन उमेदवारी मिळवतील, अशीही चर्चा सुरु झाली होती. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मेहता यांची समजूत घालून नाराजी दूर केली. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून मेहता हे शहा यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या राखी जाधव यांना तर मनसेने संदीप कुलथे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्या उमेदवारामुळे ठाकरे गटाच्या मतांचे विभाजन होण्याची अटकळ असून त्याचा लाभ शहा यांना मिळण्याची शक्यता आहे. शहा हे बांधकाम व्यावसायिक असून सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या तुलनेत अन्य उमेदवार हे फारसे तुल्यबळ नाहीत. शहा हे काही दिवसांपूर्वी पाय घसरुन पडल्याने त्यांच्या पायाला इजा झाली होती. त्यामुळे सुरुवातीला प्रचारात अडथळे आले. पण त्यांनी चिकाटीने प्रचार सुरु केला आहे.

या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा असून रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प व मिठागरांच्या जमिनींचा प्रश्न सोडवावे लागणार आहेत. भाजपच्या दृष्टीने अतिशय सोयीच्या असलेल्या या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नुकतीच प्रचारसभा घेवून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीबरोबर कडवी लढत असली, तरी या मतदारसंघात मात्र भाजपला विजय मिळविणे फारसे अवघड न जाण्याची चिन्हे आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?