स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता विशाल निकम अखेर विवाहबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा रंगत होती. सुरुवातीला त्याने शेअर केलेल्या प्री-वेडिंग व्हिडिओमध्ये वधूचा चेहरा दिसत नसल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘विशालच्या आयुष्यातील ती मुलगी कोण?’ हा प्रश्न सर्वांना पडला होता. काही दिवसांनी त्याने अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबतचा पूर्ण व्हिडिओ शेअर करत नात्याची अधिकृत घोषणा केली.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना विशाल अनेकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगायचा; मात्र तो तिचे नाव उघड करत नव्हता. तो नेहमी तिचा उल्लेख ‘सौंदर्या’ असा करायचा. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्या ‘सौंदर्या’ची चर्चा रंगत असे. नंतर विशालचा जवळचा मित्र विकास पाटील याने एका पोस्टवर कमेंट करत अक्षयाचा उल्लेख ‘विशालची सौंदर्या’ असा केल्याने दोघांच्या नात्याची चर्चा अधिकच वाढली होती. मात्र दोघांनीही अधिकृत कबुली दिली नव्हती.
१० फेब्रुवारी रोजी विशालचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याने अक्षया हिंदळकरसोबत लग्नगाठ बांधली. उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण या प्राचीन मंदिरात भगवान शिव-पार्वतीच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. हे मंदिर शिव-पार्वतीच्या विवाहस्थळ म्हणून ओळखले जाते. गंगाघाटावर साखरपुडा झाल्यानंतर पारंपरिक हळद आणि लग्नविधी संपन्न झाले. ३° सेल्सियस थंडीत मोजक्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा अनोखा सोहळा पार पडला.
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विशाल सध्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे, तर अक्षया हिंदळकर शेवटची ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत झळकली होती.
दोघांनी याआधी ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केले होते. चाहत्यांच्या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, विशाल आणि अक्षयाच्या नव्या आयुष्याला सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.